पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हवेली आणि मुळशी तालुक्यात तीन ठिकाणी एकाच वेळी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे विकास परवाना विभागाकडे चलन भरण्याची धावपळ सुरू झाली असून, दहा होर्डिंगधारकांनी प्राधिकरणाकडे ४८ लाखांची रक्कम जमा केली आहे. हवेली तालुक्यातील वडकी, मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथून कारवाईस सुरुवात करण्यात आली. या कारवाईमुळे होर्डिंगधारक आणि जाहिरात कंपन्यांनी प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलने भरण्यास सुरुवात केली आहे. एकूण १० होर्डिंगधारकांनी अंतिम चलनाची रक्कम ४८ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे.
‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रवींद्र रांजणे, तहसीलदार सचिन मस्के, अभियंता विष्णू आव्हाड, दीप्ती घुसे, प्रशांत चौगले, ऋतुराज सोनवणे, गणेश जाधव, तेजस मदने यांच्या पथकानेही ही कारवाई केली.
प्राधिकरण क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे आदींमुळे होर्डिंगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्दळीच्या आणि रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादितपेक्षा जास्त उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घ्यावेत, असे आवाहन सहआयुक्त दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.