मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील गट क्रमांक १८१, २६१ आणि १७२ या ठिकाणाच्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मोठी कारवाई करण्यात आली आहे. वाणिज्य स्वरूपाचे ८२५० चौरस फुटांचे ३० गाळे, ५ हजार चौरस फुटांचे ६ गाळे, ३२०० चौरस फुटांचे गाळे, १७६० चौरस फुटांचे ४ गाळे असे एकूण १८ हजार २१० चौरस फूट क्षेत्रातील ४५ अनधिकृत वाणिज्य गाळे पाडण्यात आले.

स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात पीएमआरडीएकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी गेलं असता, काही जणांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घेऊन प्रशासनाला सहकार्य केलं. तर इतर अनधिकृत बांधकाम धारकांकडून बांधकाम पाडकामाचा खर्च वसूल केला जाणार आहे. पीएमआरडीएच्या क्षेत्रात रितसर परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये, असं आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आलं.

मुळशीत कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणी पत्र्याचे शेड होतं. अशा प्रकारच्या बांधकामांचा पीएमआरडीए क्षेत्रात सुळसुळाट झाला असून सर्वच ठिकाणी अशी बांधकामे निष्कासित करण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली आहे.