पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित मेट्रो मार्गिकेला अडथळा ठरत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याची घाई करण्यात आली. मात्र आठ महिन्यानंतरही उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकले नसल्याची वस्तुस्थिती आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने लहान-मोठी पस्तीस कामे तातडीने करावीत. या कामांनंतरच उड्डापुलाच्या कामाला प्रारंभ होईल, अशी भूमिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतली आहे. महापालिकेकडून कामे करण्यास चालढकल होत असल्याने उड्डाणपुलाचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारला जात आहे.

पीएमआरडीएच्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेला उड्डाणपुलाचा अडथळा ठरत असल्याने तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. करोना संसर्गाच्या टाळेबंदी कालावधीत ४५ कोटी रुपये खर्च करून उभारलेला उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात आला. उड्डाणपूल पाडण्यात आल्यानंतर वाहतूक सुधारणेचा आराखडा संयुक्त बैठकीत करण्यात आला. मात्र अद्यापही उड्डाणपुलाचे काम सुरू न झाल्याने वाहनचालकांना गैरसोयीला आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात पीएमआरडीए आणि महापालिका यांच्यात नियमित बैठका सत्र सुरू आहे. महापालिकेतही काही दिवसांपूर्वी संयुक्त बैठक झाली. त्या वेळी ३५ कामांची यादी पीएमआरडीएकडून महापालिकेला देण्यात आली. ही कामे तातडीने पूर्ण होणे शक्य नाही, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. कामे पूर्ण करण्याची जबबादारी पीएमआरडीएची आहे, असे महापालिकेकडून तर महापालिकेने कामे पूर्ण केल्यानंतर कामांना प्रारंभ होईल, अशी भूमिका पीएमआरडीने घेतली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामात सातत्याने अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

रस्ता रुंदीकरण, पदपथांची रुंदी कमी करणे, रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे, पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणे अशा कामांचा यामध्ये समावेश आहे. मात्र यातील काही कामे महापालिकेशी संबंधित नाही. त्यामुळे महापालिकेने ती करण्याचा प्रश्नच येत नाही, असा पवित्रा महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले असल्याची वस्तुस्थिती आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात वाहतूक सुधारणा योजना राबवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने मेट्रो मार्गिके बरोबरच उड्डाणपूल, भुयारी मार्ग, ग्रेड सेपरेटरची बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी ४२६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो मार्गिका वगळता अन्य कामे महापालिके कडून टप्प्याटप्याने करण्यात येतील. या चौकात दुमजली पूल उभारून त्याच्या वरच्या भागातून मेट्रो आणि खालील भागातून अन्य वाहने असा उड्डाणपूलही बांधण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीनेही मंजूर केला आहे.

४२६ कोटींचा आर्थिक आराखडा

* दुमजली उड्डाणपूल- २६८ कोटी

* शिवाजीनगर-औंध भुयारी मार्ग- ६८ कोटी

* बाणेर, पाषाणसाठी दोन मार्गिका- २५ कोटी

* हरे कृष्ण मंदिर ग्रेड सेपरेटर- १५ कोटी

* वेधशाळा चौक ग्रेटसेपरेटर- १० कोटी * अभिमानश्री चौक ग्रेडसेपरेटर- ४० कोटी