पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढत्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ६५ मीटर रुंदीच्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) बाधित शेतकरी आणि खातेदारांशी थेट संवाद साधण्यासाठी हवेली, मावळ आणि मुळशी तालुक्यांत विशेष ग्रामबैठकांचे, तर मुळशी तसेच हवेली तालुक्यांत संयुक्त मोजणी सुरू करण्यात आली आहे. संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त रकमेचा लाभ देण्याची ग्वाही ‘पीएमआरडीए’ने दिली असून, १४४ कोटींचा मोबदला ‘पीएमआरडीए’कडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी यापूर्वी खेड तालुक्यातील सोळू तसेच हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे आणि निरगुडी येथील जमिनींची मोजणी पूर्ण झाली असून, ‘पीएमआरडीए’कडून १४४ कोटींचा निधी मोबदल्यापोटी वर्ग करण्यात आला आहे. आता उर्वरित आवश्यक जमिनींच्या संपादनासाठी मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील गावांसाठी ऑक्टोबर महिन्याचे विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.
स्थानिक शेतकरी आणि खातेदारांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (९ ऑक्टोबर मावळ आणि हवेली तालुक्यांत ग्रामबैठका घेतल्या जाणार आहेत. तर, साळुंब्रे आणि दारुंब्रे (ता. मावळ) तसेच मांजरी खुर्द आणि वडकी (ता. हवेली) येथे बैठका झाल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. दरम्यान, आज, गुरुवार (८ ऑक्टोबर) गोंडुबरे तसेच परंदवडी (ता. मावळ), तर ९ ऑक्टोबर रोजी सांगवडे व धामणे (ता. मावळ) येथे ग्रामबैठका होतील.
मुळशी तालुक्यातील बाधित गावांमधील खातेदारांशी थेट चर्चा करण्यासाठी मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली बावधन बुद्रुक, सूस, नांदे, माण आणि हिंजवडी येथे बैठका होतील. बाधित जमिनींचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी मुळशी व हवेली तालुक्यांत संयुक्त मोजणी मोहीम राबवली जाणार आहे.
मुळशी तालुक्यात शुक्रवारपासून (९ ऑक्टोबर) नेरे येथून मोजणीला सुरुवात होणार असून, त्यानंतर हिंजवडी, जांबे, माण, मारूंजी, नांदे, मांजरी खुर्द, कोलवडी, वडगी येथील जमिनींची संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण होईल. मोजणीनंतरच मूल्यांकनाची रक्कम निश्चित होणार आहे. या सर्व बैठकांना संबंधित बाधित खातेदारांनी स्वतः उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन ‘पीएमआरडीए’च्या जमीन आणि मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता तसेच उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले आहे.
