पुणे : ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) नागरी सुविधांसह उद्योगांसाठी पायाभूत सुविधांची आखणी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पुढील पाच वर्षांत २०८ प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, ३३ हजार ७०० कोटी रुपयांच्या निधीतून विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून यातील ९०० कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत,’ अशी माहिती ‘पीएमआरडीए‘’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा ‘पीएमआरडीए’च्या वतीने घेण्यात आली. या वेळी आयुक्त डॉ. म्हसे म्हणाले, ‘उद्योग आणि व्यवसायांच्या वाढीसाठी औद्योगिक संघटना आणि उद्योजकांच्या अडचणींचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. त्या अडचणी सकारात्मक दृष्टिकोनातून कशा सोडवता येतील, यासाठी तालुका कार्यालय स्तरावर ‘पीएमआरडीए’ तातडीने पावले उचलत आहे. उद्योजकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी सहायक नगररचनाकार आणि सहायक संचालक यांचा पूर्ण वेळ स्वतंत्र कक्ष सुरू करून उद्योजकांचे प्रश्न निकाली काढण्यात येणार आहेत. यासह तालुका कार्यालयातील अधिकाऱ्यांचे अधिकार वाढवून बांधकाम परवानगी, अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्रांसह इतर कामकाजात सुसूत्रता आणण्यात येईल.

या कार्यशाळेत चाकण औद्योगिक असोसिएशनचे मोतीलाल सांकला, राजीव रांका, डेक्कन मेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल असोसिएशनचे मायकल पीटर, वेस्टर्न महाराष्ट्र एमआयडीसी चेंबर असोसिएशन फेडरेशनचे आप्पासाहेब शिंदे यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. या वेळी चाकण, रांजणगाव, हिंजवडी, तळेगाव, पिरंगुट आदी औद्योगिक क्षेत्रांमध्ये आगामी काळात होणाऱ्या विकासकामांच्या अनुषंगाने सादरीकरणातून उद्योजकांना माहिती देण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्यासह विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तीन महिन्यांतून एकदा बैठक

औद्योगिक क्षेत्राचे प्रश्न निकाली काढण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दर तीन महिन्यांतून एकदा बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवणार आहेत. यासह उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, एमआयडीसी आणि ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून विविध विकासकामे कशी होतील, यासाठी सामूहिक प्रयत्न करणार असल्याचे या वेळी आयुक्तांनी स्पष्ट केले.

उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी शासन पातळीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करून ‘पीएमआरडीए’ हद्दीतील उद्योग आणि व्यवसायांना येणाऱ्या अडचणींसह उद्योजकांच्या समस्या निराकरणासाठी ‘पीएमआरडीए’ तत्परतेने काम करीत आहे. – डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, ‘पीएमआरडीए’