पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्र. १२ आणि ३०-३२ मधील गृहयोजनेतील एकूण १०२९ सदनिकांची संगणकीय सोडत बुधवारी काढण्यात आली. स्वतःच्या हक्काचे घर मिळाल्याचे जाहीर होताच आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उपस्थित अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, सहआयुक्त (जमीन आणि मालमत्ता) पूनम मेहता आणि सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

ज्या लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे, त्यांना कर्जप्रकरणे आणि इतर कार्यालयीन बाबींसाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासनाने सर्वतोपरी सहाय्य करावे, अशी सूचना महानगर आयुक्त अभिजीत चौधरी यांनी केली. या सोडतीमध्ये पेठ क्र. १२ आणि पेठ क्र. ३०-३२ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट अशा दोन्ही गटांची आकडेवारी जाहीर करण्यात आली.