पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंग रोडसाठीच्या १४ पैकी तीन गावांमधील जमिनींच्या दरनिश्चितीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सोलू, वडगाव शिंदे आणि निरगुडे या गावांतील जमिनींची दरनिश्चिती करण्यात आली असून, थेट जमीनखरेदीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून ‘पीएमआरडीए’ला देण्यात आला आहे.
पुणे आणि शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने अंतर्गत तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीए) बाह्य असे दोन रिंग रोड तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडचे सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, ‘पीएमआरडीए’चा रिंग रोड गेल्या काही वर्षांपासून रखडला आहे.
‘पीएमआरडीए’चा रिंग रोड हा ८३ किलोमीटर लांबीचा आणि ६५ मीटर रुंदीचा आहे. या रिंग रोडसाठी सुमारे ७०० ते ७५० एकर जागेची आवश्यकता आहे. रस्ते विकास महामंडळ करीत असलेला रिंग रोड हा सोलू गावापर्यंत येत आहे. त्या ठिकाणी ‘पीएमआरडीए’चा रिंग रोड येऊन मिळणार आहे. त्यामुळे आळंदी ते नगर रस्त्यावरील वाघोलीपर्यंत सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीच्या रिंग रोडची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया यापूर्वीच प्राधिकरणाने हाती घेतली आहे.
पहिल्या टप्प्यातील या तीन गावांमधील जमिनींचे दर निश्चित झाले आहेत. सोलू येथील ३४.६५ हेक्टर, वडगाव येथील ५.७१ हेक्टर आणि निरगुडे येथील १.४४ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. ही जमीन थेट खरेदीने खरेदी केली जाणार आहे. जमीन खरेदीसाठी रोख रक्कम अथवा टीडीआर देण्यात येणार आहे.
११ गावांतून ९२.२५ हेक्टर जमीन संपादित होणार
‘पीएमआरडीए’च्या रिंग रोडसाठी आंबेगाव, पिसोळी, वडाचीवाडी, कदमवाक वस्ती, कोलवडी, जांभूळवाडी, मांजरी खुर्द, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, येवलेवाडी या ११ गावांमधून ९२. २५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यापैकी भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी या तीन गावांच्या मोजणीनंतर जमिनींचे दर निश्चित झाले आहेत. आता त्या पाठोपाठ सोलू, वडगाव शिंदे आणि निरगुडे या तीन गावांमधील जमीन ‘पीएमआरडीए’च्या रिंग रोडसाठी संपादित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
