पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील १६ क्लस्टर्समधील २७ गावांसाठी तालुकानिहाय बाराशे कोटींच्या खर्चाचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुळशी, मावळ, खेड, शिरूर आणि हवेली या तालुक्यांमध्ये या प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांची बैठक झाली. आमदार शंकर मांडेकर, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य महानगर अभियंता रिनाज पठाण यावेळी उपस्थित होते.

स्वच्छतेसंदर्भातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, प्रगत सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे आणि कार्यक्षम तसेच किफायतशीर सांडपाणी प्रक्रिया राबवून नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शेती आणि उद्योगासारख्या कामांसाठी पुनर्वापर करण्यावरही भर दिला जाणार आहे.

महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी प्रशासनाला हे क्लस्टरनिहाय प्रकल्प एका वर्षात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांची तांत्रिक माहितीही बैठकीमध्ये देण्यात आली.

दरम्यान, यासंदर्भात नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेमार्फत प्रत्येक योजनेचे तांत्रिक सादरीकरण करण्यात आले. भविष्यकालीन वाढ लक्षात घेऊन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी आवश्यक जमीन घेण्यासंदर्भातही नियोजन करण्यात आले असून, या सर्व प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजनांचा भाग म्हणून सौरऊर्जा प्रणालीचा समावेश करण्यात आल्याने खर्चात बचत होईल, असा दावाही पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे.