पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनि:स्सारण योजना राबविण्यात येणार असून २७ गावांमधील १ हजार २०९ कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे २७ गावातील ३९ लाख ४२ हजार लोकसंख्येला फायदा होणार आहे.

पीएमआरडीएची १३ वी सभा गुरुवारी विधानभवातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या कामांना मंजुरी देण्यात आली. मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता,अपर मुख्य सचिव (नगर विकास) असीम कुमार गुप्ता उपस्थित होते. पुणे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी बैठकीत सादरीकरण केले. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार , पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दूरदृष्टी प्रणाली द्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ प्राधिकरणाकडे अग्निशमन सेवा शुल्कापोटी शिल्लक ३०० कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग अग्नि प्रतिबंधक आराखड्यानुसार विविध उपाययोजनांसाठी करण्यात येणार आहे. अग्निशमन सेवा शुल्कापोटी जमा झालेल्या निधीच्या विनियोगासाठी शहराचा ‘अग्नी प्रतिबंधक उपाययोजना आराखडा’ तयार करण्यात येईल. महानगरातून जाणाऱ्या नद्यांचे पुनरूज्जीवन करून नद्यांचे प्रदूषण रोखण्यात येतील.

दरम्यान, नवले पुलावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ या महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नवले पुलाजवळ सेवा रस्ते निर्माण करून अपघात रोखण्यासाठी अन्य पर्यायांचाही विचार केला जाणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. प्राधिकरणाच्या ताब्यातील जिल्हा परिषदेचा सुविधा भूखंडाची विकास व्यवहार्यता तपासावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

शहरातील माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील ६९७ महसुली गावांचा समावेश

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील ६९७ महसुली गावांचा समावेश आहे. या गावांचे निव्वळ क्षेत्र ५ हजार ३८३ चौरस किलोमीटर एवढे आहे.