पुणे : पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित घनकचरा प्रकल्पाच्या निर्णयानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील कचराकोंडी फोडण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. थेऊर आणि परिसरातील १३ गावांसाठी (एकूण १४ ग्रामपंचायती) मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी थेऊर येथील ‘पीएमआरडीए’ची १० एकर गायरान जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, सन २०४३ मधील संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून १५० टीपीडी (टन प्रतिदिन) क्षमतेचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

या प्रकल्पाच्या नियोजनाबाबत ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील मुख्यालयात शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या उपस्थितीत आणि महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक मंगळवारी झाली. या बैठकीला अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी, उपअभियंता रितेश मुंढे, उपअभियंता अरविंद सिद्राल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, हवेलीचे गट विकास अधिकारी शेखर शेलार यांच्यासह संबंधित १४ गावांचे सरपंच उपस्थित होते.

थेऊर (ता. हवेली) येथील उपलब्ध गायरान क्षेत्रापैकी १० एकर जागा या घनकचरा प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. सन २०४३ मधील संभाव्य लोकसंख्या लक्षात घेऊन १५० ‘टीपीडी’ क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेनुसार, प्रकल्पस्थळापासून २० किलोमीटर अंतराच्या आतील सहभागी ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कचरा संकलित करून तो या प्रकल्पस्थळी आणून देणे अपेक्षित आहे. त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी निश्चित केलेली ‘टिपिंग फी’ संबंधित ग्रामपंचायतींना भरावी लागणार आहे. तसेच, या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींकडून ठराव मागविण्यात आले आहेत.

या प्रकल्पामुळे पूर्व हवेलीतील १४ ग्रामपंचायतींच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यामध्ये थेऊर, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, केसनंद, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, साष्टे, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव प्रयागधाम, शिंदवणे, पेठ आणि कोळवडी या गावांचा समावेश आहे. ‘ज्या ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, त्यांना कचरा वाहतुकीसाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घंटागाड्या उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील,’ असे आमदार कटके यांनी सांगितले.

चाकणपाठोपाठ पूर्व हवेलीलाही दिलासा

चाकण ‘एमआयडीसी’ परिसरातील १९ ग्रामपंचायती आणि दोन नगरपरिषदांसाठी ‘पीएमआरडीए’कडून मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता थेऊर परिसरासाठी हा दुसरा मोठा प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. यामुळे ‘पीएमआरडीए’च्या दोन्ही औद्योगिक आणि निमशहरी पट्ट्यांमधील पुढील ३० वर्षांच्या कचरा व्यवस्थापनाचा आराखडा स्पष्ट झाला आहे.