पुणे : ‘येत्या काळात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रात तुकडेबंदी रद्द करण्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल,’ अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असलेले शेरेही कमी करण्यासंदर्भात पुनर्वसनमंत्री आणि विभागीय आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लोणीकंद येथे समाधान शिबिराचे आयोजन सोमवारी करण्यात आले. त्यावेळी बावनकुळे यांनी ही माहिती दिली. विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, हवेलीचे उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण साकोरे, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे या वेळी उपस्थित होते.
हवेली तालुक्यातील लोणीकंद गावाला स्वामित्व योजनेत आणून भूमि अभिलेख विभागाच्या वतीने ड्रोन सर्वेक्षण करण्यात यावे आणि मालमत्तापत्रक आणि सनद देण्यासाठी खासगी सर्व्हर तातडीने नियुक्त करावेत. तसेच, लोकोपयोगी कामे करण्यासाठी सलोखा योजनेमध्ये १५० हेक्टर जागेचा प्रस्ताव तयार करावा, अशी सूचनाही बावनकुळे यांनी केली.
दरम्यान, या शिबिराच्या माध्यमातून राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात ४० हजार फेरफार दुरुस्ती, २० हजार सातबारा दुरुस्ती, १ लाख ५० संगणकीकृत सातबाऱ्याचे वाटप, ७५ हजार ८ अ नोंदीचे वाटप, १ लाख ७५ हजार विविध प्रकारचे प्रमाणपत्राचे वाटप, ३४ हजार एक खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रमाणपत्र वाटप, २ हजार कमी जास्त पत्रक तयार केले, ५०० गावातील दस्तावेज दुरुस्ती करण्यात आले आहे, पुणे जिल्ह्यात १३ हजार ३३ दाखल्याचे वितरण करण्यात आले. एकूणच सुमारे ५ लाख परिवाराला शिबाराचा लाभ मिळाला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
