पुणे :  देशातील सर्वांत जुन्या सराफी व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ची सुरुवात केवळ एका दुकानापासून होऊन आता त्याचा विस्तार जगभरात झाला आहे. या व्यवसायाची धुरा तरूण वयात ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या खांद्यावर आली. त्यांनी या पारंपरिक सुवर्ण व्यवसायाला आधुनिकेतेचे कोंदण देऊन त्याला नव्या शिखरावर पोहोचवले. त्यांच्या आयुष्यातील हा अनुभवांचा प्रवास ‘चूजिंग गोल्ड’ आत्मचरित्रातून आता उलगडणार आहे.

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने ‘चूजिंग गोल्ड’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक वारशांपैकी एकाचा वारसा तरुण वयात स्वीकारल्यानंतर, आज वयाच्या एकोणपन्नाशीत डॉ. सौरभ गाडगीळ यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासाकडे मागे वळून पाहत त्यातील अनुभव, संघर्ष, निर्णय आणि शिकवणी यांचा प्रांजळ वेध घेतला आहे. हा प्रवास बाहेरच्या जगाला दिसणाऱ्या यशाचा नसून, त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वास्तवाचा आणि त्यातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आहे.

या आत्मचरित्रात डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या आयुष्याला आकार देणारे अनेक महत्त्वाचे क्षण, आजोबा आणि आई यांच्यासोबतचे आयुष्यभर स्मरणात राहिलेले संवाद, काळाच्या ओघात उमगलेल्या गोष्टी तसेच त्यांच्या विश्वास, धैर्य आणि मूल्यांची कसोटी पाहणारे अनेक निर्णय यांचा वेध घेतला आहे. याप्रसंगी डॉ. गाडगीळ म्हणाले की, ‘आयुष्य जगताना स्वतःसाठी जो वेळ मिळतो, त्यात आपण मागे वळून पाहतो. तशी संधी मला कधी मिळाली नाही. आत्मचरित्राच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही संधी मिळाली. स्वतःशी संवाद साधत अनेक प्रश्नांना या निमित्ताने मला सामोरे जाता आले. माझी ही कहाणी एखाद्या वाचकाला त्याचा पुढचा कठीण निर्णय अधिक धैर्याने घेण्याची प्रेरणा देऊ शकली तर माझा हेतू सफल झाला असे मानेन.’

‘आजपर्यंत मी घेतलेल्या कोणत्या निर्णयांचा मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे? कोणत्या निर्णयाबाबत आजही मनात सल आहे, कोणते निर्णय अनुभवाच्या जोरावर योग्य ठरले आणि कोणते केवळ नशिबाच्या साथीने योग्य ठरले. या सगळ्या मला पडलेल्या प्रश्नांना मी दिलेले प्रामाणिक उत्तर म्हणजे ‘चूजिंग गोल्ड’ हे पुस्तक. त्यात कोणताही आडपडदा नाही किंवा यशानंतर निर्माण होणाऱ्या परिपूर्णतेचा कोणता आवही नाही,’ असे डॉ. गाडगीळ यांनी सांगितले.

मुंबईत ६ ऑगस्टला प्रकाशन

‘चूजिंग गोल्ड’ हे डॉ. सौरभ गाडगीळ यांनी त्यांच्या आयुष्यातील निर्णय, अनुभव आणि शिकवणींचा प्रामाणिक लेखाजोखा म्हणून लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ६ ऑगस्टला मुंबईत एका खासगी कार्यक्रमात होणार असून, त्यावेळी डॉ. गाडगीळ यांच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित विशेष संवाद साधणार आहेत. या संवादातून ‘चूजिंग गोल्ड’ या पुस्तकामागील प्रवास, अनुभव आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीवर प्रकाश टाकला जाणार आहे.