scorecardresearch

देशात जातीयवाद, प्रांतवाद, धर्मवादाचे विष ; मेधा पाटकर यांची टीका

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात आहे, अशी टीका ‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’च्या नेत्या मेधा पाटकर यांनी मंगळवारी केली.

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशामध्ये जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाचे विष पसरवले जात आहे, अशी टीका ‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’च्या नेत्या मेधा पाटकर यांनी मंगळवारी केली.
निर्माण संस्था आणि मैत्री नेटवर्कतर्फे आयोजित चौथ्या भटके विमुक्त महिला हक्क परिषदेचे उद्घाटन मेधा पाटकर यांच्या हस्ते झाले. निर्माण संस्थेच्या वैशाली भांडवलकर, कमल चव्हाण आणि कविता टाक या वेळी उपस्थित होत्या. देशामध्ये सत्तेवर असलेल्या सरकारकडून जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मवादाच्या वाढत्या प्रभावाला खतपाणी घातले जात आहे, असे सांगून पाटकर म्हणाल्या, समाजामध्ये लोक वेगवेगळय़ा प्रकारे वंचित, शोषित, पीडित आहेत. तर, काही जाणीवपूर्वक वगळले गेले असल्याचे चित्र दिसत. राज्यघटनेने देशातील सर्वाना समान हक्क दिले आहेत. मात्र, भटक्या विमुक्त समाजाला हक्क देण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. आपल्या हक्कांसाठी दलित, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांना लढावे लागत आहे. हात जोडून भीक मागण्यांसाठी नाही तर मूठ आवळून हक्क मिळवून घेण्यासाठी भटक्या विमुक्तांनी सज्ज झाले पाहिजे. कोणताही गुन्हा घडल्यानंतर पारधी समाजाच्या लोकांना ताब्यात घेतले जाते. त्यामुळे गुन्हेगार जमात असा शिक्का त्यांच्यावर बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना अजूनही आहे. ती काढून टाकणे हा अस्मितेचा प्रश्न आहे, असे सांगून पाटकर यांनी भटक्या विमुक्तांना परिघाबाहेर ठेवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात असल्याचे सांगितले.
भटक्या विमुक्तांना मूलभूत सुविधांपासून दूर ठेवणारा समाज आणि शासन हेच खरे अपराधी आहेत, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले. भांडवलकर यांनी प्रास्ताविकामध्ये परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Poison racism provincialism theism country criticism medha patkar amy

ताज्या बातम्या