पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.

चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २८, रा. कदम चाळ, संतोषी माता मंदिराजवळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ठोंबरे याच्यासह साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गेल्या वर्षी ‘मकोका’ कारवाई केली होती. कारवाईनंतर ठोबरे पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. ठोंबरे हा सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.

पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते, सहायक आयु्क्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमले, सागर बोरगे, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, किरण साबळे यांनी ही कामागिरी केली.

वाहनांची तोडफोड करुणारा अटकेत

घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर वाहनाची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. राजरत्न कुलदीप खरे (वय २०, रा. एसआरए वसाहत, भीमनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी खरे याच्याबरोबर तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. ३१ जानेवारी रोजी खरे आणि त्याच्याबरोबर असलेले अल्पवयीन साथीदार दुचाकीवरुन बी. टी. कवडे रस्ता परिसरात आले. आरोपींनी शस्त्रे उगारून दहशत माजविली. एका दुकानात शिरुन तोडफोड केली, तसेच वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला. खरे याच्यासह अल्पवयीनांना ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, राजू कदम, शिवाजी जाधव, योगेश जाधव, राहुल मोरे यांनी ही कामगिरी केली.

शहर परिसरात वर्षभरापासून वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना वाढल्या आहे. वाहन तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या सराइतांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. वाहन तोडफोडीचे गुन्हे विचारात घेतल्यास बहुतांश गुन्ह्य्यात अल्पवयीन सामील असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हेगारीचे आकर्ष, तसेच परिसरात दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड केली जाते.