पुणे : ‘भरधाव टँकरमुळे शहरात गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत. या पार्श्वभूमीवर टँकरचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे गरजेचे आहे. नियम धुडकाविणाऱ्या भरधाव टँकरचालकांसह मालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिला.

पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाकडून झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसांकडून टँकरचालक आणि मालकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी टँकरचालकांना सूचना दिल्या. तसेच, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

या बैठकीत पाणी वाहतूक करणारे टँकरचालक, मालक, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता, हडपसर भागातील महंमदवाडी, उंड्री, पिसोळी, काळेपडळ, तसेच वानवडी भागातील नागरिक सहभागी झाले होते. या वेळी नागरिकांनी टँकरमुळे होणारी कोंडी, भरधाव टँकरमुळे घडलेल्या अपघाताच्या घटना याबाबत तक्रारी केल्या. टँकरचालक, मालकांनी या बैठकीत सूचना केल्या.

‘कोंढवा, उंड्री, पिसोळी भागातील सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होतो. वाढती लोकसंख्या विचारात घेऊन या भागातील अनेक साेसायट्यांना महापालिकेच्या जलकेंद्रातून पाणी विकत घेऊन पुरवठा केला जातो. बहुतांश सोसायट्यांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. या भागातील रस्त्यांवरून पाण्याच्या टँकर वाहतुकीसाठी वेळ ठरवून दिली पाहिजे’, असे टँकरमालकांनी या वेळी सांगितले.

या बेैठकीत सहभागी झालेल्या नागरिक, तसेच पाणी वाहतूक करणारे टँकरचालक, मालकांच्या सूचना विचारात घेतल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, ‘टँकरचालकानी वेगमर्यादेचे तसेच वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. टँकरची नियमित सुरक्षाविषयक तपासणी केली पाहिजे.

टँकरचालकांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास मालकांनी त्यांना समज देऊन योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. मद्यप्राशन करणाऱ्या चालकांना कामावर ठेवू नये. एखाद्याने गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास त्यााला पाठीशी घालू नये. बेशिस्त टँकरचालकांमुळे अपघात घडल्यास चालकासह मालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे टँकरचालकांसह मालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.’

‘शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, कोेंडी न होऊ देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे. बेशिस्त वाहनचालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. नियमांचे पालन केल्यास गंभीर स्वरूपाच्या अपघातांच्या घटना कमी होतील,’ असे आवाहन अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी केले.