पुणे : मेफेड्रोनची (एमडी) नशा करणाऱ्यांची पोलीस आयुक्तालयात सोमवारी चौकशी करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वत: नशेखोरांची चौकशी केली. ‘चौकशीत काही जण शहरातील काही पब चालकांच्या व्यवस्थापकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे’, अशी महिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. या प्रकरणाच्या तपासात सराईताला अटक करण्यात आली होती. चौकशीत सराईताने मेफेड्रोनची विक्री शहरातील काही जणांना केल्याचे उघडकीस आले होते. मेफेड्रोन विक्री प्रकरणी पोलिसांनी सराईतासह साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी मेफेड्रोनची नशा करणाऱ्यांना चौकशीसाठी सोमवारी पुणे पोलीस आयुक्तालयात बोलाविले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नशेखोरांची स्वत: चौकशी केली. पोलिसांनी मेफेड्रोनची नशा करणाऱ्या २१ जणांची चौकशी केली. नशेखोरांची संपूर्ण माहिती पोलिसांनी (डोजियर) कागदपत्रांत घेतली. त्यांचे नातेवाईक, मित्र, परिचित, पूर्ण पत्ता, यापूर्वी दाखल गु्न्ह्यांची माहिती या कागदपत्रांद्वारे भरून घेण्यात आली.

उपसरपंचापासून बांधकाम व्यावसायिकाची चौकशी

मेफेड्रोनची नशा करणाऱ्या २१ जणांची पोलिसांनी सोमवारी पोलीस आयुक्तालयात चौकशी केली. उपसरपंच, बांधकाम व्यावसायिक, रिक्षाचालक, कुरिअर कर्मचारी, जमीन खरेदी विक्री करणारे, ओैषध विक्री दुकानातील कर्मचारी अशांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली नशेखोरांची चौकशी करण्यात आली. शहरात अमली पदार्थ विक्री करणारे, तस्कर, तसेच नशेखोरांविरुद्ध यापुढील काळात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.