पिंपरी : बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा पतीने जाब विचारल्याने सात जणांच्या टोळक्याने पतीला बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २० ऑगस्ट रोजी म्हाळुंगेत घडली. दीपक मधुकर जाधव (वय २५, रा. दिघी), दीपक सुभाष सोनवणे (वय २६, रा. म्हाळुंगे), तेजस सोपान गाढवे (वय २६), सचिन बालाजी चांदुरे (वय ३३), अक्षय मारुती पाटील (वय २७, रा. चिखली) अशी अटक पाच आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार बंटी आणि गोल्या या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> परदेशात नोकरी हवीय? पुण्यात मिळणार संधी…
२३ वर्षीय महिलेने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या २८ वर्षीय पतीचा खून करण्यात आला. फिर्यादी महिला व त्यांचे पती हे मुलांसह जेवणाकरिता एका हॉटेलमध्ये गेले होते. फिर्यादी यांचे पती देयक (बिल) भरत असताना मुलासह त्या बाहेर थांबल्या होत्या. या वेळी दीपक दुचाकीवरून तिथे आला. त्याने फिर्यादीच्या अंगावर एक चिठ्ठी फेकली. याचा जाब फिर्यादी यांच्या पतीने विचारला असता, आरोपींनी त्यांना तिथे मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीला आरोपींनी फोन करून एका लॉजवर भेटण्यास बोलावले. त्यानंतर फिर्यादी, पती मुलांसह तिथे गेले असता आरोपींनी पतीला दांडक्याने, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनादेखील आरोपींनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे तपास करीत आहेत.