शहरातील प्रमुख चौकांतील सिग्नल यंत्रणेतील (ट्रॅफिक कंट्रोल बॉक्स) बॅटरी चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी नुकतीच अटक केली. या टोळीने शहरातील वेगवेगळ्या भागांतील प्रमुख चौकांतील ३४ बॅटऱ्या चोरल्याचे निष्पन्न झाले. यामुळे एकूणच सरकारी मालमत्ता चोरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याची आणि पर्यायाने त्या सुरक्षित ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. सिग्नल यंत्रणेतील बॅटरी, मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना साहित्य चोरी, दूरसंचार विभागाच्या तारा, ग्रामीण भागातील महावितरणच्या रोहित्रांची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरण्याचे प्रकार वाढले असून, अशा प्रकारचे गुन्हे करणारे चोरटे मिळेल त्या किमतीत भंगार माल व्यावसायिकांना सरकारी मालाची विक्री करत असल्याचे दिसून आले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना सर्वाधिक चोऱ्या झाल्या. मेट्रो मार्गिकेच्या सिग्नल यंत्रणेसाठी लागणाऱ्या तारा, स्थानकातील अंतर्गत कामासाठी वापरले जाणारे लाेखंडी साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या. आठवड्यापूर्वी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेसाठी वापरण्यात येणारी केबल बाणेर परिसरातून चोरीला गेली. नंतर लगेचच आता हे सिग्नल यंत्रणेतील बॅटरी चोरीचे प्रकरण उजेडात आले. या गुन्ह्यात चक्क रिक्षाचालक सामील असल्याचे आढळले. त्याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. या प्रकरणात असे आढळले, की सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करणाऱ्या खासगी कंपनीतील कर्मचारी असल्याचे भासवून चोरट्यांनी बॅटऱ्या चोरून नेल्या. बॅटरी यंत्रणेला संवेदक बसविण्यात आले होते. त्यामुळे बॅटरी चोरल्यानंतर लगोलग हा प्रकार उघडकीस आला.

दूरसंचार विभागाच्या केबल चोरीची घटना कोथरूड भागात वर्षभरापूर्वी घडली होती. आता अशा केबल, बॅटऱ्या, मेट्रो साहित्याच्या चोरीची झळ सामान्यांना बसत नाही. मात्र, ग्रामीण भागातील महावितरणच्या विद्युत रोहित्राच्या तोडफोडीचा थेट शेतकऱ्यांना फटका बसतो. पुणे जिल्ह्यात रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारांसह ऑइल चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रोहित्र चोरीमागे भंगारमाल व्यावसायिक आणि चोरट्यांची हातमिळवणी असल्याचे उघडकीस आले आहे. रोहित्राची तोडफोड केल्यानंतर वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता असते.

पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर, भोर या तालुक्यांत रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ पोहोचते. त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. रोहित्र चोरी केल्यानंतर नवीन रोहित्र बसविण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागतो. रोहित्र वाहतूक, वायरमन, किरकोळ खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. काही वेळा रोहित्राच्या दुरुस्तीसाठी शेतकरीच वर्गणी काढतात. थकीत वीज देयक असल्यास किमान ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय नवीन रोहित्र बसवले जात नाही, अशी व्यथा शेतकरी मांडतात.

शेतकऱ्यांच्या बांधापासून रोहित्र काही अंतरावर बसविण्यात आलेले असते. चोरटे दिवसा पाहणी करून रात्री चोरी करतात. ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची वेळ चोरट्यांना माहीत असते. रात्री रोहित्रांचा वीजपुरवठा बंद केला जातो. शिडीचा वापर करून रोहित्र काढले जाते. वीजपुरवठा बंद केल्यानंतर तांब्याच्या तारा काढण्यासाठी अर्ध्या ते पाऊण तासाचा वेळ लागतो. एका रोहित्राची तोडफोड केल्यानंतर ६० किलो तांब्याच्या तारा काढल्या जातात. भंगारात तांब्याच्या तारांना ५०० रुपये भाव किलोमागे मिळतो. एका रोहित्रातून तांब्याच्या तारा चोरल्यानंतर चोरट्यांना किमान २५ हजार ते ३५ हजार रुपये मिळतात, असे ग्रामीण पाेलीस दलातील अधिकारी सांगतात.

एकूणच सरकारी माल चोरणाऱ्या चोरट्यांचे सध्या फावले असून, गंभीर गुन्हे घडत असताना आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असलेल्या पोलिसांसमोर या चोऱ्या रोखण्याचेही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना आढळून आल्यास त्वरित पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे.

rahul.khaladkar@expressindia.com