पुणे : भवानी पेठेतील कासेवाडी भागात बेकायदा दवाखाना चालविणाऱ्या तोतया डाॅक्टरला पोलिसांनी अटक केली. गेले ३२ वर्ष तो वैद्यकीय पदवी नसताना कासेवाडी भागात दवाखाना चालवित होता. मे महिन्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो फरारी झाला होता. प्रमोद राजाराम गुंडू (वय ५७) असे तोतया डॉक्टरचे नाव आहे. गुंडू याने वैद्यकीय अभ्यासक्रम केला नव्हता. तसेच वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीही केली नव्हती. गेले ३२ वर्ष तो कासेवाडी भागात बेकायदा दवाखाना चालवित होता. तो रुग्णांवर उपचार करत होता. याबाबतची माहिती मिळाल्यावर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील पथकाने त्याच्याविरुद्ध कारवाई केली. त्याच्या विरुद्ध २ मे रोजी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरारी होता.
गुंडू याने शिवाजीनगर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो नामंजूर केला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. त्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. खडक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले. गुंडू याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. फरारी झाल्यानंतर तो कुठे गेला, तसेच त्याला कोणी आश्रय दिला? यादृष्टीने तपास करायचा असल्याने सरकारी वकिलांनी पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालायकडे केली. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (१० नोव्हेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा व्यवसाय करणाऱ्या तोतया डाॅक्टरांविरुद्ध महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहराच्या वेगवेगळ्या भागात कारवाई करून बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तोतया डाॅक्टरांविरुद्ध कारवाई केली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. यापूर्वी वारजे, कात्रज भागात कारवाई करून तोतया डाॅक्टरांना पकडण्यात आले होते. लोणी काळभोर भागात एका कपांऊंडरने (मदतनीस) दवाखाना सुरू केला हाेता. सर्दी, खोकला, ताप अशा विकारांवर तो उपचार करत होता. बेकायदा वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी दिला आहे. बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणे हा कायद्याने गुन्हा आहे. शहरातील वसाहतीत काहीजण वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा दवाखाना चालवितात.
