पुणे : वैमनस्यातून टोळक्याने डहाणूकर कॅालनी परिसरातील लक्ष्मीनगर वसाहतीत दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने घरावर दगडफेक केली तसेच एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली.
आकाश शिवराम दंडगुले (वय १९), साहील महेश मळेकर (वय १८, दोघे रा. लक्ष्मीनगर वसाहत, डहाणूकर कॅालनी, कोथरुड), राहुल दत्तात्रय कडू (वय ३७, रा. वडगाव धायरी, रायकर मळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका अल्पवयीन मुलीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डहाणूकर कॅालनी परिसरात लक्ष्मीनगर वसाहत आहे. या भागातील एका तरुणाशी आरोपी आकाश, साहील यांचा वाद झाला होता. त्यानंतर आकाश, साहील, राहुल साथीदारांसोबत लक्ष्मीनगर वसाहतीत आले. त्यांनी वसाहतीत दहशत माजवून शिवीगाळ केली. अल्पवयीन मुलगी राहत असलेल्या घराच्या दरवाज्यावर लाथ मारली. त्यानंतर टोळके घरात शिरले. अल्पवयीन मुलीला मारहाण करुन दहशत माजविली. पसार झालेल्या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या बरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके तपास करत आहेत.



