पुणे : महागड्या गाड्यांमधून सफर, लग्नाचे आमिष आणि..; २५५ तरुणींना गंडा घालणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उच्चशिक्षित आणि गलेलठ्ठ पगार असलेल्या तरुणींना हेरून आरोपी मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन त्यांच्यासोबत ओळख वाढवत होते

Police arrested two accused of financially defrauding 255 young women

उच्चशिक्षित आणि गलेलठ्ठ पगार असलेल्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निशांत रमेशचंद्र नंदवाना आणि विशाल हर्षद शर्मा अशी अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. दोघे आरोपी मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन तरुणींशी ओळख करायचे. प्रेमाच्या आणि लग्नाच्या शपथा घेऊन तरुणींचा विश्वास संपादन करून त्यांचे लैंगिक शोषण करून आणि लाखो रुपये घेऊन दोघे ही पसार होत होते. आत्तापर्यंत दोन्ही आरोपींनी पुणे, बंगळुरु आणि गुडगाव येथील एकूण २५५ मुलींना फसवल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुलींचा दीड कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचं पुढे येत आहे. गंभीर बाब म्हणजे अनेक मुलींचे आरोपींनी लैंगिक शोषण केले असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात एक तक्रारही पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणीची आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषण झाल्याची तक्रार दाखल होती. पीडित तरुणी आणि आरोपींची ओळख मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन झाली होती. गंभीर बाब म्हणजे त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून कारमध्ये जबरदस्तीने बलात्कार केल्याची माहिती पुढे आली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर दुसरी तक्रार देखील संबंधित आरोपींविरोधात आल्याने पोलिसांना हे प्रकरण अधिक गंभीर असल्याचे लक्षात आले. 

तपास सुरु करताच आरोपी हे बंगळुरू येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, बंगळुरू येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी हे वेगवेगळ्या नावाने राहात असल्याचं समोर आले आहे. निशांत आणि विशाल अशी दोघांची मूळ नावे असून ते आम्ही केंद्रीय मंत्रालयामध्ये कामाला असल्याचे तरुणींना सांगत. त्यांच्या या भूल थापाना तरुणी बळी पडत होत्या, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

आरोपी कशा प्रकारे फसवायचे?

आरोपी निशांत आणि विशाल हे दोघे मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन तरुणींशी जवळीक साधायचे. अगोदर त्यांचा विश्वास संपादन करून मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे आरोपी भासवत. त्यानंतर, भेट, फोन, चॅटिंग वाढल्यानंतर महागड्या गाड्यांमधून तरुणींना फिरत असत. त्यामुळे मुलींना दोघांवर अधिकच विश्वास बसत असे. आपण कस्टमच्या व्यवसाय करू पण त्यामध्ये मला काही लाख रुपये कमी पडत आहेत असे ते मुलींना सांगत. आपलं लग्न होणार असून हा व्यवसाय केल्यास आपलं भविष्य सेट होईल असे म्हणून तरुणींकडून लाखो रुपये उकळत होते. काही दिवस तरुणीच्या संपर्कात राहून दोन्ही आरोपी पसार व्हायचे. त्यानंतर मोबाईल बंद करून टाकत.  आत्तापर्यंत दोन्ही आरोपींनी २५५ तरुणींना फसवलं असून दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 

वेगवेगळ्या शहरात विविध नावांचा करायचे वापर

आरोपी निशांत रमेशचंद्र नंदवाना हा पुण्यात अधितांश अग्निहोत्री, बंगळुरु येथे अभय कश्यप आणि गुरगावमध्ये आधव अग्निहोत्री अशी बनावट नावे वापरून तरुणींना फसवत असे. तर, आरोपी विशाल हर्षद शर्मा हा पुण्यात आश्विक शुक्ला, बंगलोर येथे अथर्वन तिवारी आणि गुरगावमध्ये अव्यागृह शुक्ला, रुद्रान्स शुक्ला, देवांश शुक्ला किंवा अचैत्य शुक्ला नावाने तरुणींना फसवत असे, असे पोलीस तपासात समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे या आरोपींनी अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police arrested two accused of financially defrauding 255 young women abn 97 kjp

Next Story
आता Google सोबत काम करण्यासाठी बाहेर कुठे जाण्याची गरज नाही; पुण्यात सुरू होणार नवं ऑफिस
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी