पिंपरी : शहरात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पारपत्र, जन्मदाखला व शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे सापडली. दरम्यान, आतापर्यंत शहरात घुसखोरी केलेल्या ३५ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोहग सुकुमार मजुमदार (वय २०,बगेरहाट, बांगलादेश), सुमन गोपाळ टिकादार (वय ३५,खुलना, बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार मोहसीन रमजान शेख यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोहग आणि सुमन अवैधपणे चिंचवडमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवादविरोधी शाखेला मिळाली. दहशतवादविरोधी शाखा आणि पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे, तसेच भारतामध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या वैध व्हिसाशिवाय भारत-बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले.

शोहग हा चिंचवड एमआयडीसी मध्ये एका बांधकाम प्रकल्पावर मजूर म्हणून काम करत होता. त्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये आधारकार्ड तयार केले. त्यावर पश्चिम बंगाल मधील पत्ता आहे. तर सुमन हा हरियाणा राज्यात पानिपत येथे मजुरी काम करत होता. शोहग हा चार पाच वर्षांपूर्वी आई-वडिलांसोबत भारतात आला. त्यांना एका मध्यस्थाने दुचाकीवरून भारतात आणले. सुरुवातीला दोन महिने तो पश्चिम बंगाल येथील त्याच्या मामाकडे राहिला. त्यानंतर त्याचे आई वडील बांगलादेशात परत गेले. शोहग याने पश्चिम बंगाल मधील २४ परगणा जिल्ह्यात एक वर्ष एका चप्पलच्या दुकानात काम केले. त्यानंतर त्याच्या एका मित्राने पुणे शहरात काम आहे, असे सांगितले. त्यामुळे त्याने आधारकार्ड बनवून घेतले आणि सुमन या मित्रासोबत तो रेल्वेने पुण्यात आला. त्याला मराठी, हिंदी भाषेत बोलता येत नसल्याने शोहग चिंचवड एमआयडीसी मधील बांधकाम प्रकल्पावर काम करत असलेल्या मजुरांना त्याच्यावर संशय होता. याबाबत पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी कक्षातील पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो बांगलादेशी असून त्याने घुसखोरीच्या माध्यमातून भारतात आल्याचे सांगितले.

सुमन हा हरियाणा राज्यातील पानिपत येथे राहत असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी सुमन याची माहिती काढून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने पानिपत हरियाणा येथील पत्त्यावर भारतात आधारकार्ड, पॅनकार्ड, पारपत्र काढल्याचे आढळले. सुमन देखील त्याच्या आई वडिलांसोबत भारतात आला होता. तो डिसेंबर २०२४ मध्ये कामाच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आला होता. बांगलादेशातील दोघेजण बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत होते. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाईल, असे दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested two bangladeshis who illegally residing in pimpri city pune print news ggy 03 zws