पुणे येथील सहकारनगर परिसरातील लॉजमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २६ मुलींची सुटका करण्यात आली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य संशयित आरोपी रघु शेट्टी, शेखर अण्णा, रुपेश आणि राजन हे फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती एका व्यक्तीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी काल, बुधवारी सहकारनगर परिसरातील बालाजीनगरमध्ये असणार्या रविकिरण, सागर आणि एनएम लॉजवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी एकूण २६ मुलींची सुटका केली असून, त्यात नवी मुंबई, कोलकाता, उत्तर प्रदेश आणि पुण्यातील मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे. पृथ्वीराज सिंग (वय २४, रविकिरण लॉज, बालाजीनगर), विनोद अक्षय पांडे (वय २२, अंजलीनगर, कात्रज), सचिन दत्तात्रय इंगळे (वय २३, बालाजीनगर), अनिल रावसाहेब लोंढे (वय २१, बालाजीनगर), सतीश चलवे गोंढा (वय ३७, सागर लॉज, बालाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. तर मुख्य आरोपी रघु शेट्टी, शेखर अण्णा, रुपेश, राजन हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.