लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विसर्जन मिरवणुकीत उच्चक्षमतेचे ध्वनीवर्धक वापरल्यास ध्वनीवर्धक यंत्रणा जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. ध्वनीवर्धक यंत्रणा पुरवठादार, तसेच ध्वनीवर्धक यंत्रणा हाताळणाऱ्यांविरुद्ध (डीजे) कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीची तयारी अनेक मंडळांनी सुरू केली आहे. विसर्जन मिरवणुकीत उच्चक्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा, तसेच डोळे दिपवणारे लेझर झोत वापरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ध्वनीवर्धक यंत्रणेत ‘प्रेशर मोड’उपकरणाचा वापर केला जातो. कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदुषण होते. त्याचे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात. ध्वनीप्रदुषणाबाबत सर्वोच्च न्यायालय, तसेच राष्ट्रीय हरित लवादाने निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा वापरणारे डीजे, तसेच ध्वनीवर्धक पुरवठादारांविरुद्ध कारवाई करण्यात येतील. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन ध्वनीवर्धक यंत्रणा जप्त करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांनी आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा >>>पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
ड्रोन कॅमेऱ्यांचा वापरास पोलीस परवानगी
ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरास पोलिसांकडून परवानगी मिळवणे आवश्यक आहे. विसर्जन मिरवणुकीत ड्रोन कॅमेरा वापरणाऱ्यांनी विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे अर्ज करावेत. परवानगी शिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल. विनापरवानगी ड्रोन वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
घातक लेझर झोतांवर कारवाई
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेझर दिव्यांचा वापर करण्यात आला होता. घातक झोतांमुळे अनेकांना त्रास झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. कोल्हापूरमध्ये लेझर झोतांमुळे तिघांच्या डोळ्यांना इजा पोहोचल्याची घटना नुकतीच घडली होती. विसर्जन मिरवणुकीत लेझर झोतांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध हडपसर पोलिसांकडून नुकतेच गुन्हे दाखल करण्यात आले.