वैभवशाली विसर्जन परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपासून डोळे दिपवणाऱ्या प्रकाशझोतांचा (लेझर बीम) वापर करण्यात येत आहे. लेझर प्रकाशझोतांमुळे डोळ्यांना इजा पोहोचल्याच्या घटना गेल्या वर्षी घडली होती. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यास बंदी घातली आहे. प्रकाशझोतांचा वापर केल्यास कारवाईचा इशारा मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस मुख्यालयात शहरातील सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड: हप्ता वसुली करणाऱ्या भाईला बेड्या; पोलिसी खाक्या दाखवताच हात जोडून मागितली माफी गेल्या विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. प्रकाशझोतांमुळे अनेकांना त्रास झाला होता. काहींच्या डोळ्यांना इजा झाली होती. ध्वनिवर्धकाचा वापर मोठ्या प्रमाावर करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येतो. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकाचा वापराबाबत काही निर्देश दिले आहे. या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. ध्वनीवर्धक पुरवठादार व्यावसायिकांशी चर्चा करण्यात येणार आहे. लवकरच ध्वनी यंत्रणा सांभाळणाऱ्या (डीजे) तंत्रज्ञांची बैठक आयेजित केली जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले. हेही वाचा >>> शुल्क सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांची तक्रार करता येणार; शिक्षण विभाग आता कारवाई करणार उत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियोजन शहराच्या मध्यभागात उत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होती. फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक समस्या, वाहनांसाठी जागा (पार्किंग) याबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. चोरीच्या घटना रोखणे, वाहतूक समस्या, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत पोलिसांनी आतापासून तयारी सुरू केली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. मानाच्या मंडळांची पसंती ढोल पथकांना मानाच्या मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांना पसंती दिली आहे. मानाची मंडळे मिरवणुकीत ध्वनिवर्धकांचा वापर करत नाहीत. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येते. बँड, ढोल पथकांचा समावेश मिरवणुकीत असतो, असे मानाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. मंडळांसमोर एक पथक विसर्जन मिरवणुकीत एक पथक असावे, याबाबत पोलीस मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मंडळांसमोर किती पथके असावी, त्यातील वादकांची संख्या किती असावे, पथकाने प्रमुख चौकात किती वेळ वादन करण्यात येणार आहे, याबाबतही चर्चा केली जाणर आहे. ढोल-ताशा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी पोलीस संवाद साधणार असून, स्वतंत्र बैठक आयोजित केली जाणार आहे, असे अमितेश कुमार यांनी सांगितले. उत्सवात मद्यबंदीसाठी पाठपुरावा उत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात दहा दिवस मद्य विक्री करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी सूचना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली. मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.