पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या वाकडेवाडीतील कार्यालयावर पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाई केली. मात्र, कारवाईत काही संशयास्पद आढळून आले नाही. गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. ‘या कार्यालयाबाबत आलेल्या एका तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे पथक तेथे गेले. तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आल्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी तेथून परतले’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, नरेश अरोरा यांनी मंगळवारी रात्री प्रसारमाध्यमांसमोर बाजू मांडली. ते म्हणाले, ‘गुन्हे शाखेचे पथक कार्यालयात आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीबाबत माहिती दिली. आमची कंपनी कोणतेही बेकायदा काम करत नाही. कंपनीच्या कामाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी काही कागदपत्रे मागितली. पोलिसांच्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत. मी राजकीय व्यक्ती नाही. गेल्या १० वर्षांपासून मी काम करत आहे. माझे अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी या बाबत समाजमाध्यमात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.’
दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे तळ ठोकून आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांची समाज माध्यमातील प्रतिक्रिया
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम नरेश अरोरा यांची संस्था करत आहे. पुणे पोलिसांचे पथक तेथे गेले होते. पोलिसांना संपूर्ण माहिती देण्यात आली. कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही. नरेश अरोरा आणि त्यांची संस्था ‘डिझाईन बाॅक्स’ यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करणारा पक्ष आहे. पोलिसांना सहकार्य करण्यात आले आहे. कृपया चुकीची माहिती पसरवून नये,’ असे अजित पवार यांनी समाज माध्यमातील प्रतिक्रियेत म्हटले आहे.
