पुणे : न्यायालयीन वाॅरंटची (नाॅन बेलेबल वाॅरंट) बजावणी, तसेच मदत करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. कोरेगाव पार्क परिसरात ही कारवाई करण्यात आली. आठवडभरात पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक महिलेसह तिघांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
गणेश शहाजी कस्पटे (वय ४०, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार हे खासगी कंपनीत कामाला आहेत. संबंधित कंपनीच्या मालकाविरुद्ध हैदराबाद येथील न्यायालयात धनादेश न वटल्याप्रकरणी खटला दाखल आहे. या खटल्यात न्यायालयाने कंपनीच्या मालकाविरुद्ध वाॅरंट बजाविले होते. ते बजाविण्याचे काम कोरेगाव पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले होते. हवालदार कस्पटे हे वाॅरंट बजावणे, तसेच न्यायालयीन कामकाज पाहतात.
वाॅरंट न बजाविण्यासाठी मार्च महिन्यात खासगी कंपनीच्या मालकाकडून हवालदार कस्पटे यांनी पाच लाख रुपये घेतले होते. त्यानंतर पुन्हा वाॅरंट न बजाविण्यासाठी, तसेच मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीत त्यांनी दोन लाख रुपये मागितले होते. त्यानंतर बुधवारी दुपारी बोट क्लब रस्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या हवालदार कस्पटे यांना पकडले. त्यांनी तडजोडीत दीड लाख रुपये घेतल्याचे उघड झाले.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर आणि पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलीस आयुक्त भारती माेरे तपास करत आहेत.
