पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल अशोक मद्देल (वय ४२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. मद्देल हडपसर पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मस्करीत खिशातील मोबाईल काढणे बेतलं जीवावर; दगडाने ठेचून केली मित्राची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला वडगाव शेरी भागातील शिवराणा प्रताप पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. तेथे तिची पोलीस हवालदार मद्देल याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला जाळ्यात ओढले. मुलगा आणि पतीस खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केले, तसेच तिच्याकडून त्याने वेळोवेळी पैसे उकळले. पोलीस उपनिरीक्षक मुळूक तपास करत आहेत. दरम्यान, मद्देल याने महिला, तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध खंडणी उकळल्याची फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे: हिंदी चित्रपटसृष्टीतील सहकलाकारांना शस्त्राच्या धाकाने लुटले

मद्देलने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित महिला, तिचा पती आणि साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने ओळख वाढवून मैत्री केली. त्यानंतर घर खरेदी; तसेच अन्य कारणांसाठी वेळोवेळी दोन लाख ३५ हजार रुपये घेतले. पैसे परत मागितल्यानंतर महिलेने बलात्कार केल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन एक लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले, असे पोलीस हवालदार राहुल मद्देल याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constable rapes woman by threatening to implicate family members in false crime pune print news rbk 25 zws
First published on: 27-05-2023 at 18:06 IST