पिंपरी: सायलेन्सरमध्ये बदल करून घेत ‘फट फट फटा’, ‘ठो’ अशाप्रकारचे कर्णकर्कश आणि भीतिदायक आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्या विरोधात वाहतूक पोलीसांनी विशेष मोहीम राबवली, दंडात्मक कारवाई देखील केली. मात्र, तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत. पोलीसांच्या कारवाईला न जुमानता बुलेटचालकांची मुजोरी सुरूच आहे. त्यामुळे अशा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यास पोलीसांनी सुरुवात केली आहे. वेळप्रसंगी वाहन जप्त करणे तसेच परवाना निलंबित करण्यापर्यंतचाही विचार सुरू असल्याचे वाहतूक पोलीसांकडून सांगण्यात आले.

पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात वाहतूक पोलिसांच्या वतीने एक जानेवारीपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत चित्रविचित्र आवाज काढणाऱ्या स्वयंघोषित ‘बुलेट राजांच्या’ विरोधात कारवाई सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत २२०० हून अधिक बुलेटचालकांच्या विरोधात कारवाई करत त्यांच्याकडून २२ लाख रूपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे बुलेटचालकांमध्ये काही काळ चलबिचल झाली. मात्र, फारसा परिणाम जाणवला नसल्याचे दिसू लागले आहे. या विशेष मोहिमेनंतरही शहरभरात, गल्लीबोळात धावणाऱ्या बुलेटमधून चित्रविचित्र तथा धडकी भरेल, अशाप्रकारचे आवाज काढले जातात. गर्दीच्या रस्त्यांवर उभ्या-आडव्या पध्दतीने बुलेट चालवली जाते. बेदरकारपणे वाहन चालवणारे बुलेटचालक रस्त्यावरील वाहतूक पोलीसांना बिलकूल जुमानत नसल्याचे निदर्शनास येते. ही बाब लक्षात आल्याने वाहतूक पोलीसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढे दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच चालकांवर गुन्हे दाखल केले जातील, वेळप्रसंगी वाहन परवाना निलंबित करण्याचाही विचार सुरू असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.

पाहा व्हिडीओ –

महिना कारवाई संख्या दंड रक्कम

जानेवारी ४१२            चार लाख १२ हजार

फेब्रुवारी २०१             दोन लाख १ हजार

मार्च            १२३            एक लाख २३ हजार

एप्रिल ५१९            पाच लाख १९ हजार

मे             ४१९            चार लाख १९ हजार

जून            ५४०            पाच लाख ४० हजार

सायलेन्सर बदलून भीतिदायक स्वरूपाचे आवाज काढणाऱ्या बुलेटचालकांचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. याबाबतच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यानुसार, सहा महिन्यांपासून कारवाईचे सत्र सुरू आहे. जवळपास २२०० चालकांवर कारवाई करून २२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही बुलेटचालकांमध्ये फरक पडलेला नाही. त्यामुळे आता बेदरकारपणे वाहने चालवणारे, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. असे प्रकार वारंवार करणारे आढळून आल्यास त्यांच्याकडील वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. अधिक कठोर कारवाई कशाप्रकारे करता येईल, यासाठी परिवहन विभागाशी चर्चा सुरू आहे.

– आनंद भोईटे, वाहतूक उपायुक्त, पिंपरी पोलीस आयुक्तालय