पालिकेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कोंढवा भागामध्ये एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, कायदा- सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली आहे.
शिवसेनेचे भरत चौधरी यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने प्रभाग क्रमांक ६३ मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एमआयएमनेही उमेदवार उभा केला आहे. या उमेदवाराच्या प्रचारार्थ २६ ऑक्टोबरला कोंढवा परिसरात ओवेसी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या परवानगीसाठी पक्षाकडून २२ ऑक्टोबरला पोलिसांकडे अर्ज सादर करण्यात आला होता.
ओवेसी यांच्याकडून करण्यात येणारी वादग्रस्त विधाने व त्याबाबत त्यांच्यावर दाखल झालेल्या विविध गुन्हय़ांचा दाखला देत कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पक्षाने मात्र त्यास आक्षेप घेतला आहे. पोलिसांचा हा निर्णय चुकीचा असून, त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.