कृष्णा पांचाळ

गणेश उत्सव, रमजान ईद, ख्रिसमस, इंग्रजी नवीन वर्ष आलं की हमखास पोलीस तुमच्या आणि देवाच्या संरक्षणासाठी ऑन ड्युटी २४ असतात. परंतु, याच देवाची सेवा करत असताना आज मात्र ते स्वतः देव बनून नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नागरिक समजण्याच्या पलीकडे गेले असून करोना विषाणू हा थट्टेचा विषय झाला आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. करोना विषाणू विषयी काही नागरिकांना अजिबात गांभीर्य नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार आवाहन करून ही काही नागरिक त्याला प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे. यामुळेच मंगळवारी महाराष्ट्रात विविध ठिकाणी कुठे सिंघम तर कुठे सिम्बा स्टाईल घरा बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसांनी चोप दिल्याच पाहायला मिळाले.

करोना विषाणूने अवघ्या देशाला हैराण करून सोडले आहे. महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून या विषाणू चा प्रादुर्भाव झाल्याचं दिसलं. आज याच शहरात १९ आणि १२ असे करोना बाधित रुग्ण आहेत. शहरातील प्रशासनाने वारंवार नागरिकांना गर्दी करू नये गर्दी चे ठिकाणे टाळावीत अस सांगितले मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत आपले सजक नागरिक आहेत तरी कुठे. दोन्ही शहरातील डॉक्टर्स ने करोना बाधितांवर स्वतः चा विचार न करता कर्तव्य बजावत आहेत. याचा विसर नागरिकांना पडला आहे का? इतर देशात जे घडलं तेव्हांच आपण शुद्धीवर येऊन बुद्धीचा वापर करणार आहोत का असे अनेक प्रश्न पडतात. अशावेळी एकच व्यक्ती धावून येतात ते म्हणजे पोलीस!

गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना राज्य आणि केंद्र शासन अगदी योग्य भाषेत सांगत होत. करोना विषाणू हा गंभीर विषय आहे. परंतु अवघ्या महाराष्ट्रात कोणीच सतर्क राहण्यास तयार नव्हत अस दिसत होतं. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यूचे आवाहन केले आणि अवघ्या देशाने प्रतिसाद दिला. मात्र दुसऱ्या दिवसाचे उलट चित्र होते अनेक नागरिक हे रस्त्यावर होते वाहतूक सुरू होती. यामुळे राज्यशासनाने संचार आणि जमावबंदी केली. त्यानंतर ही अनेक महाभाग घराबाहेर पडत होते. पोलिसांनी अनेक वेळा आवाहन ही केलं. काही नागरिकांनी मात्र कानावर हात ठेवत आपली वागणूक बदलली नाही. मंगळवारी ही असेच काही नागरिक, तरुण बाहेर पडत असताना त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. नागरिकांमधून ही पोलिसांचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे पोलीसांना बळ मिळाले. खर तर पोलीस देखील सर्वसामान्य मनुष्य आहेत. आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी अशा नात्यात असताना आपल्या सुरक्षेसाठी २४ तास राबत आहेत याचा विचार करण गरजेचं आहे.

सध्याची परिस्थिती खूप भयाण आहे. करोना विषाणू च्या प्रादुर्भावाने सर्व नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अश्या परिस्थितीत पोलीस रस्त्यांवर थांबून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांची काळजी करणारे अनेक जण असून केवळ तुमच्या सुरक्षेसाठी ते रस्त्यांवर उतरले आहेत. आजपासून घरात राहून करोना चा प्रादुर्भाव तर रोखू शिवाय पोलिसांना ही त्यांची काठी चालवण्याची गरज पडणार नाही असं वागूयात. त्यांना सहकार्य करून पोलिसात दडलेल्या त्या देवाचे आपण धन्यवाद मानू.