पुणे : शिवाजीनगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रयाचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून परदेशी तरुणीसह तिघींना ताब्यात घेतले. तरुणींना देहविक्रयास प्रवृत्त केल्याप्रकरणी दाेन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजीनगरमधील एसटी स्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये देहविक्रयाचा प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध विभागाला (एएचटीयू युनिट) मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून परराज्यातील एका तरुणीला ताब्यात घेतले. त्यानंतर सेनापती बापट रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये परदेशी तरुणीसह दोघींना दलालांनी आणल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सेनापती बापट रस्त्यावरील हाॅटेलमध्ये छापा टाकून परदेशी तरुणीसह दोघींना ताब्यात घेतले. या प्रकरणी दलालांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, ईश्वर आंधळे, तुषार भिवररकर, अमेय रसाळ, अविनाश शिंदे, जाधव, तसेच पोलीस महिला पोलीस कर्मचारी खेडेकर, इंगळे, रेश्मा कंक यांनी ही कारवाई केली.