पुणे : पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाकडील अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून चोरटे पसार झाल्याची घटना वारजे भागातील डुक्करखिंड परिसरात घडली. या प्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकं काय झालं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे वारजे माळवाडी भागात राहायला आहेत. ते दररोज सायंकाळी चालायला जातात. रविवारी (१० मे) सायंकाळी सहाच्या सुमारास ते मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावरुन निघाले होते. वारजे भागातील डु्क्करखिंड परिसरात चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. या भागात ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील सोनसाखळी, अंगठी असा दोन लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. अंगठी आणि सोनसाखळी कागदात बांधून देण्याचा बहाणा केला. त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यंचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे अंगठी आणि सोनसाखळी लांबवून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.
शहरात पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. पाषाण-सूस रस्ता टेकडी परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाकडे पोलीस असल्याची बतावणी करुन दागिने चोरुन नेण्याची घटना नुकतीच घडली होती. पौड रस्ता परिसरात चोरट्यांनी ज्येष्ठाकडे बतावणी करुन दागिने चोरुन नेले होते. आठवडभरात पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक करण्याच्या तीन घटना शहरात घडल्या आहेत. पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या चोरट्यांपासून सावध रहावे, तसेच बतावणी करणारे चोरटे आढळून आल्यास त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
एसटी स्थानकात ज्येष्ठाची सोनसाखळी चोरी
स्वारगेट एसटी स्थानकात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे धायरी भागात राहायला आहेत. ते शनिवारी (९ मे) विवाह समारंभानिमित्त कोल्हापूरला निघाले होते. एसटी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
