पुणे : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी रात्री दहा नंतर रस्त्यांवर लावण्यात येणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, पानटपऱ्या, तसेच छोटी हॉटेल्स बंद करण्याचा फतवा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढला आहे. पोलीस आयुक्तांनी काढलेल्या या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
कायदा आणि सुरक्षा सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयावर शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी टीका केली आहे. खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद करून गुन्हेगारी थांबणार आहे का ? छोट्या स्टॉल व्यवसायिकांच्या उपजीविकेवर बंधन अन्यापेक्षा पोलीस आयुक्तांनी पोलिसांची भीती गुन्हेगारांच्या मनात कायम कशी राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी भूमिका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या या अजब निर्णयाच्या विरोधात वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करून रात्री दहा नंतर खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांवर घालण्यात आलेली बंदी तातडीने उठवावी, असे निवेदन देण्याची तयारी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयावर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, शहरातील ज्या भागात रात्रीच्या वेळी गुन्हेगारांचे अड्डे जमतात, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली पाहिजेत. रात्री दहानंतर रस्त्यांवरील स्टॉल सरसकट बंद करणे चुकीचे आहे. अनेक कुटुंबांची उपजीविका यावर सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) अध्यक्ष सुनील टिंगरे म्हणाले, शहरातील अनेक भागांत छोटे व्यावसायिक रात्री स्टॉल्स लावून पदार्थांची विक्री करतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, नोकरीला जाणारे आणि घरापासून दूर राहणाऱ्या तरुणांना या स्टॉल्सवर कमी दरात खाणे उपलब्ध होते. पानटपऱ्या, तसेच जेथे चुकीचे प्रकार घडतात, त्यांच्यावर कारवाई करून ते बंद करण्यास कोणाचाही विरोध नाही. पण, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना यामधून सूट दिली पाहिजे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, शहरातील छोट्या व्यावसायिकांवर अन्याय करणारा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी रात्री दहानंतर स्टॉल बंद होणे गरजेचे आहे, असे वक्तव्य करणे म्हणजे पोलिसांचा स्वत:वर विश्वास नाही. मोठी हॉटेल, पब यांना सवलत आणि छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई यामुळे गुन्हेगारी थांबणार आहे का? शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख वसंत मोरे म्हणाले, पोलीस आयुक्तांनी घेतलेला निर्णय म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार आहे. गुन्हेगारी वाढत असल्याने हा निर्णय घ्यावा लागणे हे पोलिसांचे अपयश आहे. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. गुन्हेगार पोलिसांना घाबरत नाहीत. रस्त्यावरील दुकाने बंद ठेवून गुन्हे थांबणार आहेत का? नागरिकांना सुरक्षित वाटणार आहे का?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील म्हणाले, रात्री दहानंतर स्टॉल बंद करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केवळ स्टॉल बंद करून उपयोग होणार आहे का? पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने हजारो विद्यार्थी येथे राहतात. रात्रीच्या वेळी त्यांना स्टॉलवर कमी दरात जेवण मिळते. याचा कोणताही विचार पोलीस आयुक्तांनी केला नाही. पब, मोठे हॉटेल्स यामुळे गुन्हेगारी वाढत नाही का? शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले, पोलीस आयुक्तांनी घेतलला निर्णय छोटे व्यावसायिक, तसेच रात्रीच्या वेळी या स्टॉलवर पोट भरणारे विद्यार्थी, तसेच नोकरदारांवर अन्याय करणारा आहे. पानटपऱ्या, गुटखा तसेच ड्रग्जची विक्री करणारी ठिकाणे बंद करणे योग्य आहे. पण खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बंदी घालणे योग्य नाही. गुन्हेगारी कशी थांबवायची, यावर पोलिसांनी काम केले पाहिजे. दुकाने बंद करून हे थांबणार आहे का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी देखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले, रात्री दहा वाजता खाद्यपदार्थ विक्री करणारे स्टॉल्स बंद करून गुन्हेगारी कमी होणार आहे का? शिक्षण, नोकरीनिमित्त शहरात आलेले बहुतांश विद्यार्थी रात्री दहानंतर या स्टॉल्सवर खाण्यासाठी येतात. छोट्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह स्टॉल्सवर अवलंबून असतो. पोलीस प्रशासन जबरदस्तीने छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने बंद करणार असतील, तर त्यामधून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळेल.
