महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या येत्या रविवारी होणाऱया जाहीर सभेचे ठिकाण अखेर निश्चित झाले आहे. ही सभा डेक्कनजवळ नदीपात्रात होणार असल्याचे पक्षाचे पदाधिकारी दीपक पायगुडे यांनी सांगितले. पोलीसांनी या ठिकाणी सभा घेण्यास आधीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणावरून गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घोळावर अखेर पडदा पडला.
नदीपात्रात जाहीर सभा घेण्यास पुणे पोलीसांनी गुरुवारीच मंजुरी दिली आहे. डेक्कन परिसरात नदीपात्रात मनोरंजननगरीजवळ सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी मनसेच्या शहरातील पदाधिकाऱयांनी डेक्कन पोलीस ठाण्याकडे केली होती. ४ फेब्रुवारी रोजी परवानगी मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्याला गुरुवारी संध्याकाळी पोलीसांनी होकार दिला.
मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आणि अलका टॉकीजजवलील टिळक चौकात परवानगी मागितली होती. मात्र, स. प. महाविद्यालयाने सभेसाठी परवानगी नाकारली होती. कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभेसाठी परवानगी देण्यात येणार नाही, असे स. प. महाविद्यालयाने याआधीच निश्चित केले असल्याने परवानगी नाकारण्यात आली होती. टिळक चौकात सभा घेतल्यास वाहतुकीची मोठी कोंडी होईल, त्यामुळे तिथे पोलीसांनी सभा घेण्यास परवानगी नाकारली. या सर्व पार्श्वभूमीवर नदीपात्रात सभा घेण्याशिवाय मनसेकडे पर्याय नव्हता आणि त्यामुळेच पक्षाने तो निवडल्याचे समजते.