पुणे : कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने छापा टाकला. याप्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाकेर रमेश बागवे (वय ३६, रा. लोहियानगर, भवानी पेठ), हरून नबी शेख (वय २५ ), बिक्रम साधन शेख (वय २५), अमानत अन्वर मंडल (वय २२), अमानत अन्वर (वय २४, तिघे मूळ रा. पश्चिम बंगाल ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा >>> छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला भेग? महापालिका आयुक्त म्हणतात…
नावे बाकेर बागवे हॉटेल चालक असून, अन्य चौघेकर्मचारी आहेत. त्यांच्याकडून २३ हजार ५०० रुपये किमतींची सुगंधी तंबाखू आणि हुक्कापात्र जप्त करण्यात आले. कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरात ‘द व्हिलेज’’ हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्यातील पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस मानसिंग पाटील आणि पथकाने गुरुवारी रात्री तेथे छापा टाकला. बाकेर शहर काँग्रेसचे नेते रमेश बागवे यांचा मुलगा आहे.