पिंपरी-चिंचवड : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी, रावेत आणि आळंदी फाटा परिसरातील स्पा सेंटरवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने कारवाई करत आठ महिलांची सुटका केली आहे.
आळंदी फाटा येथील सप्तगिरी लॉजमध्ये पाच महिलांकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली होती, त्यानुसार पथकाने लॉजवर छापा टाकत संबंधित पाच महिलांची सुटका केली. या प्रकरणी लॉज मालक गजानन सटवाजी आव्हाड याच्यावर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या कारवाईत, हिंजवडीतील सनराईज वेलनेस आयुर्वेदिक स्पा आणि रावेत येथील निसर्गम आयुर्वेदिक स्पा सेंटरवर छापे टाकण्यात आले. या दोन्ही ठिकाणांहून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून संबंधित महिला स्पा मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने शहरातील हॉटेल्स, स्पा सेंटर, मसाज पार्लर तसेच ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाविरोधात एकूण २६ गुन्हे नोंदवून ४२ जणांना अटक केली आहे. या कारवाईत ५५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
याशिवाय रस्त्यावर उभे राहून जाणाऱ्या-येणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांविरोधातही पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ९७ महिलांवर ६५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, पोलिस आयुक्त विनायककुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरातील चार स्पा सेंटरवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये वाकड येथील रुपनेस स्पा, द वेदा स्पा, न्यू ओम स्पा तसेच एका रहिवासी फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत स्पा सेंटरचा समावेश आहे.
ही कारवाई आयुक्त विनायककुमार चौबे, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते, भास्कर पुल्ली तसेच कर्मचारी मारुती करचुंडे आणि गणेश कारोटे यांच्या पथकाने केली.
