पुणे: शहराचा विस्तार वाढला आहे. नोकरी, राेजगाराच्या शोधात परप्रांतातून, परगावातून अनेकजण शहर, परिसरात स्थायिक होतात. पण, त्याच जोडीने अलीकडे परगावातील गुन्हेगार आपल्या गावातील पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी शहरातील दाट वस्तीचा गैरफायदा घेऊन तेथे स्थायिक होत असल्याचे दिसते. यातील अनेकजण घर विकत घेण्यापेक्षा भाडेकरू म्हणून राहतात. कर चुकविण्यासाठी किंवा सरकारी प्रक्रिया टाळण्यासाठी रोखीने व्यवहार करून खोल्या देणारे घरमालक अशांना भाडेकरू म्हणून ठेवून घेतात आणि फसतात, असे लक्षात आले आहे.

त्यामुळे, अशा परिस्थितीत घरमालकांनी थोड्या तसदीकरिता भाडेकरूंची माहिती लपवणे धोकादायक आहे. शहराची सुरक्षितता विचारात घेऊन ही माहिती देणे प्रत्येक घरमालकाचे कर्तव्य आहे. भाडेकरार न करता सदनिका, वसाहतीतील खोल्या वापरास देणे हा कायद्याने गुन्हा आहे, याची जाणीव अनेकांना नसल्यानेही भाडेकरूंची माहिती देण्यास चालढकल केली जाते, जी अंगलट येऊ शकते. अशा प्रकरणात पोलीस थेट गुन्हाही दाखल करू शकतात.

भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्याबाबत पोलिसांनी वेळोवेळी आवाहन केले आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ (३) अन्वये घरमालकांनी भाडेकरूंची माहिती, तसेच खासगी व्यवसाय करणाऱ्या मालकांनी नोकरांची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. याबाबत पोलिसांनी वेळोवेळी आदेश दिले आहेत, तसेच भाडेकरू आणि नोकरांची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिसांनी वेळोवेळी केले आहे. या आदेशाकडे काणाडोळा करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर पोलिसांनी आता थेट घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. लोणी काळभोर, हडपसर, फुरसुंगी परिसरातील घरमालकांविरुद्ध पोलिसांनी नुकतेच गुन्हे दाखल केले.

वास्तविक, भाडेकरार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरजही नाही. वकिलामार्फत भाडेकरार केल्यानंतर त्याची प्रत ऑनलाइन पद्धतीने पोलिसांना उपलब्ध होते. विशेष म्हणजे भाडेकरार करण्यासाठी फार मोठी रक्कमही मोजावी लागत नाही. भाडेकरू आणि घरमालकाने खर्च विभागून घेतल्यास भाडेकरार करण्याची प्रक्रिया सुलभ पार पडते. भाडेकरार केल्यास कायदेशीर पुरावाही उपलब्ध होतो. भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यास भाडेकरूला घरमालक नोटीस बजावून त्याला विहित कालावधीत घर किंवा सदनिका मोकळी करून देण्यास सांगू शकतो. ऑनलाइन पद्धतीने पार पडणारी ही प्रक्रिया सुलभ असल्याने थेट पोलीस ठाणे गाठणेही गरजेचे नाही.

उपनगरात अनेक शिक्षण संस्था आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणींना सदनिका भाडेतत्त्वावर दिल्या जातात. सुरुवातीला घरमालकाच्या अटी मान्य केल्या जातात. मात्र, त्यानंतर रात्री-अपरात्री सोसायटीत गोंधळ घालणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे असे प्रकार घडतात. यामुळे सोसायटीतील रहिवासी मेटाकुटीला येतात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. अशा वेळी भाडेकरार न करता, भाडेकरू ठेवलेले असल्यास घरमालक गोत्यात येऊ शकतो.

अलीकडे शहरात काही जण भाडेतत्त्वावर खोली घेऊन शहरातच गुन्हे करतात. पोलिसांनी माग काढण्यास सुरुवात केल्यानंतर पसार होतात. घरमालकाकडे भाडेकरूची माहिती उपलब्ध नसल्यास तपासात अडथळे येतात. यापूर्वी तर दहशतवादी कारवायांत गुंतलेल्यांना भाडेतत्त्वावर सदनिका देण्यात आल्याचेही तपासात उघडकीस आले होते. सदनिका मालकांनी याबाबतची माहिती पोलिासांना दिली नव्हती. कोंढवा भागात पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांना भाडेतत्त्वावर सदनिका देणाऱ्या घरमालकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली नव्हती, तसेच भाडेकरारही केला नव्हता. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी घरमालकाविरुद्ध कारवाई केली होती.

जंगली महाराज रस्त्यावरील बाॅम्बस्फोट प्रकरणात दहशतवाद्यांनी पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीत खोली भाडेतत्त्वावर घेतली होती. कासारवाडीतील घरमालकाने पोलिसांना याबाबतची माहिती पोलिसांना दिली नसल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन वेळोवेळी करूनही त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. ही चालढकल घरमालकांच्या अंगलट येऊ शकते, याची जाणीव असणे गरजेचे आहे. त्यामुळे पै-पै साठवून विकत घेतलेले घर किंवा सदनिका भाडेतत्त्वावर देताना घरमालकांनी सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा, पोलिसांकडेही गुन्हे दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.