पुणे : महिलेची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका सराइताविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाघू तुकाराम हळंदे (रा. वारजे) याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार महिला धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहायला आहेत. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. महिलेच्या पतीने एकाकडून वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील ८५० चौरस फूट जागा खरेदी केली होती. खरेदीचा कायदेशीर व्यवहार झाला होता.

गुंड गजानन उर्फ गजा मारणे टोळीतील सराइत हळंदे याने जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला. महिला आणि तिच्या कुटुंबीयांना तेथे येण्यास मनाई केली. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने तपास करत आहेत.

औषध वितरकाची साडेतीन कोटींची फसवणूक

सदाशिव पेठेतील एका औषध वितरकाची तीन कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका महिलेसह साथीदाराविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. औषध वितरकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार औषध वितरकाचे सदाशिव पेठेत दुकान आहे.

आरोपींनी औषध वितरकाकडून २०२४ मध्ये तीन कोटी ५४ लाख रुपयांची औषधे खरेदी केली होती. औषध खरेदी व्यवहारातील पैसे नंतर देतो, असे सांगितले होते. औषध घेतल्यानंतर आरोपींनी त्यांना पैसे परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वितरकाने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक जानराव तपास करत आहेत.

कोथरूड, कात्रज भागात घरफोडी

कोथरूड, कात्रजमधील आंबेगाव परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी तीन लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक परिसरात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे आंबेगावमधील जांभूळवाडी रस्त्यावर असलेल्या केंदुळकर निवास इमारतीत राहायला आहेत. चोरट्यांनी मंगळवारी (१३ जानेवारी) दुपारी घराचे कुलूप तोडून कपाटातील अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करत आहेत.

कोथरूडमधील आत्रेय सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वारजे भागात राहायला आहेत. त्यांचे आई-वडील आत्रेय सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी १२ जानेवारी रोजी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविल्याची घटना घडली. पोलीस हवालदार माळी तपास करत आहेत.