लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहर, परिसरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी सायंकाळी दोन गटात वाद झाला झाला. वादातून दगडफेक, तसेच वाहने जाळण्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी ७० जणांना पकडले असून, नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात सतर्कतेचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले. रात्रीपासून शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी घडामोडींवर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, संवेदनशील भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूरमधील हिंसाचाऱ्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. काही अनुचित घटना प्रकार घडल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाशी (क्रमांक ११२) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समाज माध्यमात अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.