उद्घाटन कार्यक्रमाची प्रतीक्षा न करता पोलिसांकडून चौकीचे कामकाज सुरू

शिवाजी खांडेकर, पिंपरी

चिखली घरकुल प्रकल्पातील पोलीस चौकीच्या उद्घाटनाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवादाचा कलगीतुरा रंगला होता. श्रेयवादाच्या या कलगीतुऱ्यात चौकीच्या कामकाजाला विलंब होऊ नये, यासाठी पोलिसांनी उद्घाटन कार्यक्रमाची प्रतीक्षा न करता चौकीच्या कामकाजाला नुकतीच सुरुवात करून राजकारण्यांना चांगलीच चपराक दिली.

राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका सुरू असते. तसाच प्रकार भोसरी विधानसभा मतदारसंघामध्येही आहे. शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव व भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्यात वाद आहेत. पालिकेचे प्रकल्प असोत वा राज्य सरकारने राबविलेले प्रकल्प असोत, या सर्वच ठिकाणी श्रेयवादाची लढाई ठरलेली असते. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नसल्याचे नेहमीच पाहायला मिळते. पुणे आयुक्तालयात असताना निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिखलीचा भाग येत होता. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरकुल, निगडी ओटा स्कीम आदी भागात भुरटय़ांची गुन्हेगारी वाढत होती. त्यासाठी तेथील रहिवाशांनी पोलीस चौकी सुरूकरण्याची मागणी केली होती.

या मागणीनंतर तत्कालीन पुणे आयुक्तालयातील परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी त्या बाबतचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तालयाला सादर करून चौकीची मंजुरी मिळवली. त्यासाठी स्थानिक शिवसेना व भाजपच्या लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला होता. पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर घरकुल चौकीचा भाग चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला.

रहिवाशांनी मागणी केल्यानंतर मंजुरी मिळूनही उद्घाटनाअभावी चौकीचे कामकाज सुरू होत नव्हते. पोलीस प्रशासनाने भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे उद्घाटनाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर दोन्ही पक्षांकडून आमच्या पक्षाच्या नेत्यांकडूनच हे उद्घाटन झाले पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला.

त्यामुळे पोलिसांची द्विधा अवस्था झाली. कोणी उद्घाटन करायचे या बाबत निर्णय होत नव्हता. शेवटी प्रतीक्षा करून भाजप, शिवसेनेच्या श्रेयवादाला फाटा देत पोलिसांनी चौकी कार्यान्वित केली आहे.