पुणे : सर्वोच्च न्यायालयाने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील भोंग्याच्या आवाजाबाबत निर्देश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवरील अधिकृत, तसेच बेकायदा भोंग्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवर असलेल्या भोंग्याच्या आवाज मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भोंग्यामुळे ध्वनीप्रदुषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने राज्य शासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची बैठक घेतली. विविध मंदिरे, प्रार्थनास्थळांवर बसविलेले अधिकृत, तसेच बेकायदा भोंग्यांची माहिती संकलित करून याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे शहरातील विविध प्रार्थनास्थळांवर १८३० भोंगे असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. एक हजार मंदिरे, १३० चर्च, २०० बौद्ध विहार, ३०० मशीद, १५० दर्गा, ५० मदरशांवर भोंगे आहेत. राज्य शासनाने भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. दिवसा ५५ डिसिबल, सायंकाळी ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यत आली आहे. रात्री दहा ते सकाळी सहा यावेळेत भोंगे बंद ठेवण्यात यावेत, तसेच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.