रात्री उशिरा जाऊन हॉटेल चालकांना त्रास देणाऱ्या आणि व्यावसायिकांकडून वसुली करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याची सविस्तर कहाणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना समजली. त्यामुळे आयुक्तांनी त्या कर्मचाऱ्याची बदली तत्काळ मुख्यालयात केली. पण, त्याच्यावरील अर्थपूर्ण व्यवहारावर जीव असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला एक आठवडा उलटला, तरी पोलीस ठाण्यातून सोडले नाही.. नंतर त्याची बदली केली खरी, पण ‘अर्थपूर्ण व्यवहारां’मुळेच त्याला सोडायला उशीर झाल्याचे आयुक्तांच्या कानावर पोहोचल्यामुळे आता पोलीस अधिकाऱ्याचे धाबे दणाणले असल्याची चर्चा पोलीस दलात आहे. या प्रकारानंतर पोलीस आयुक्तांकडे आणखी काही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरस कहाण्या पोहोचल्या असल्याची चर्चाही रंगली आहे.
कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल चालक, व्यावसायिक या पोलीस कर्मचाऱ्याला वैतागले होते. त्यामुळे त्यांनी या कर्मचाऱ्याबाबत पोलीस ठाण्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. पण, पोलीस ठाण्याने दखल न घेतल्याने त्यानंतर काहीच फरक पडला नाही. मग या हॉटेल चालक, व्यावसायिकांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्यासोबतच्या बैठकीत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारींचा पाढा ऐकवला. आयुक्तांनी त्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याबाबत अनेक तक्रारी असल्याचे समजले. त्यामुळे आयुक्तांनी त्या कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करून तसा आदेशही काढला.
पोलीस आयुक्तांनी बदलीचा आदेश काढल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पोलीस ठाण्यातून तत्काळ सोडून देणे व पोलीस मुख्यालयात पाठवणे गरजेचे होते. मात्र, त्याला आठवडाभर तिथेच ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला सोडण्यात आले. हा विलंब होण्याचे कारण अर्थपूर्ण असल्याच्या तक्रारीसुद्धा पोलीस आयुक्तांच्या कानावर गेल्या आहेत. याशिवाय आता इतरही पोलीस ठाण्यांमध्ये असे उद्योग सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचल्या असून, त्यांची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. याची कुणकुण कर्मचाऱ्यांना लागल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे. आता इतर कर्मचाऱ्यांवरही आता पोलीस आयुक्त काय कारवाई करणार, याबाबतची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.