मुंबई : पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला निती आयोगाने मंजुरी दिल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जाणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकार तसेच रेल्वे बोर्डाचीही यापूर्वीच मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादन व अन्य प्रक्रियाही सुरू झाल्या आहेत.

सध्या पुणे ते नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नाही. त्यामुळे पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. परिणामी रेल्वे प्रवासाचा कालावधी सहा तासांपेक्षा जास्त होतो. त्यामुळे या दोन शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे संकल्पना अंमलात आणली जात आहे. या मार्गासाठी १०२ गावांतील १ हजार ४७० हेक्टर जमिन लागणार आहे. गावांतील भूसंपादन आणि संरेखनासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण होत आहे. पाच गावातील भूसंपादनही झाले असून त्यांना योग्य मोबदलाही दिला आहे.

प्रकल्पानुसार, पुणे रेल्वे स्थानकातून हायस्पीड रेल्वे सुटताच ती हडपसपर्यंत उन्नत मार्गावरुन धावेल. त्यानंतर हडपसर ते नाशिक रेल्वे स्थानकापर्यंत जमिनीवरुन धावणार आहे. या रेल्वेला चाकण, मंचर, नारायण गाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक येथे थांबा असेल. या मार्गावरुन प्रति तास २०० किलोमीटर वेगाने गाडी धावेल. त्याचा वेग जास्तीत जास्त प्रतितास २५० किलोमीटपर्यंत जाऊ शकतो. प्रकल्पाची एकूण किंमत १६ हजार ३९ कोटी रुपये आहे.

राज्याला ११ हजार कोटी

रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट केल्याने फायदा झाला आहे. २००९ ते २०१४ दरम्यान महाराष्ट्राला ११०० कोटी रुपये निधी मिळाला होता. परंतु यंदा ११ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिल्याचे दानवे म्हणाले. देशातील सर्वच रेल्वे मार्गाचे विदयुतीकरण २०२३ पर्यत पूर्ण होईल. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन येत्या काही दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.