scorecardresearch

विस्कळीत पाणीपुरवठय़ाच्या मुद्दय़ावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

शहरात कमी दाबाने आणि विस्कळीत स्वरूपात होत असलेल्या पाणीपुरवठय़ावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.

प्रतिनिधीक छायाचित्र

पुणे : शहरात कमी दाबाने आणि विस्कळीत स्वरूपात होत असलेल्या पाणीपुरवठय़ावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. पाणीप्रश्नावरून खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बापट यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी प्रश्न तापणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून शहराच्या बहुतांश भागाला कमी दाबाने आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात कालवा समितीच्या बैठकीत खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक भूमिका घेत सभात्याग केला होता. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही बापट यांनी दिला होता.
या दरम्यान, बापट यांनी काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन तेथील पाण्याचा दाब मोजला होता. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी आता भाजपच्या प्रमुख माजी पदाधिकाऱ्यांच्या घरातील पाण्याचा दाब मोजला जाईल, असा इशारा दिला आहे. खासदार, आमदारांच्या निवासस्थानातील पाण्याचा दाब मोजला जाईल असे मनसेकडून सांगण्यात आले.
सत्तेच्या पाच वर्षांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपने काय केले याची तसेच समान पाणीपुरवठा योजनेचे काय झाले याची माहिती द्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनीही या प्रकारावरून बापट यांच्यावर टीका केली आहे. महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यापासूनच पुण्याच्या पाणीपुरवठय़ात खंड पडत आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे, ही वस्तुस्थिती आपली भाजपची कारकीर्द संपल्यानंतर खासदार गिरीश बापट यांच्या लक्षात आली आहे. आयुक्तांच्या घराची पाहणी केल्यानंतर बापट यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे आणि जनतेला सांगावे. गेल्या पाच वर्षांतील अपयशी कारकिर्दीचा ठपका आता महापालिका आयुक्तांवर ठेवून काही उपयोग नाही. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुणेकर गेल्या पाच वर्षांतील भाजपचा महापालिका कारभार पाहून भाजपला घरी पाठवतील, असे काकडे यांनी सांगितले.
समान पाणीपुरवठा योजना मार्गी लागत नाही, असे सांगत खासदार गिरीश बापट यांनी अपयशाची कबुलीच दिली आहे. समान पाणीपुरवठा योजनेतील दिरंगाई दूर करण्यासाठी माजी नगरसेवकांना पत्र पाठविण्याऐवजी बापट यांनी अपयशाबद्दल पुणेकरांना माफीपत्र द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. महापालिकेत सत्ता असताना पाच वर्षे झोप काढली का, असा प्रश्नही जोशी यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, असमान पाणीपुरवठय़ाला भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही जबाबदार असल्याचा आरोप आम आमदी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताकाळात अपुरा, कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र भाजपला सत्ताकाळात ही योजना मार्गी लावता आली नाही. त्यामुळे अपयशाचे खापर कोणाच्या तरी नावाने फोडण्याचा अट्टाहास या सर्व पक्षांचा सुरू आहे, असे किर्दत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Political allegations issue disrupted water supply political amy

ताज्या बातम्या