पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा; निदर्शने केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा भाजपचा इशारा
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय घमासान सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केल्यानंतर सत्तेचा आणि पोलीस बळाचा वापर करून निदर्शने केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपने दिला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पालिका आवारातील कार्यक्रमाच्या मोजक्या उपस्थितीवरून कार्यक्रम भाजपकेंद्रित असाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
मेट्रो मार्गिका आणि महापालिका भवनात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावण यासह विविध प्रकल्पांची उद्घाटने करण्यासाठी पंतप्रधान मोदी सहा मार्च रोजी पुण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना काळे झेंडे दाखविले जातील, असा इशारा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिला आहे. त्याला सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेही प्रत्युत्तर दिले आहे. पोलीस बळाचा वापर केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असे भाजप शहराध्यक्ष मुळीक यांनी जाहीर केले.
पंतप्रधानांचा दौरा शासकीय असताना त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केला जात आहे. सन २००७ च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर २००६ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग बीआरटीच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांचा दौरा राजकीय होता का, अशी विचारणा मुळीक यांनी केली. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिकेतील कार्यक्रम पंचवीस जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश पोलीस आणि पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित यंत्रणांनी महापालिकेला दिले आहेत. त्यावर भाजपकेंद्रित कार्यक्रम करण्याचा सत्ताधारी प्रयत्न करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.
नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व उठून दिसावे आणि त्यांची बडदास्त ठेवता यावी म्हणून कार्यक्रम केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत करण्याचा भाजपचा डाव आहे. पुण्यात शिवरायांचे बालपण गेले, असे असताना पुतळय़ाचे अनावरण भव्यदिव्य सोहळय़ात होणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यापुरता हा सोहळा मर्यादित ठेवला जात आहे, असा आरोप जगताप यांनी केला.