scorecardresearch

पिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा

पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायट्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये मतपेटीचे राजकारण सुरू झाले आहे.

पिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा
सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’

पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायट्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये मतपेटीचे राजकारण सुरू झाले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शहरात बुधवारी (५ ऑक्टोबर) सोसायट्यांचा मेळावा होणार आहे. त्याचवेळी, सोसायटीधारकांच्या समस्यांना राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असून हे निवडणुकीचे राजकारण असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे उत्तर राष्ट्रवादीने दिले आहे.

हेही वाचा >>> आगाऊ हवामानाचा अंदाज, योग्य नियोजनामुळे यंदा पुणे शहरात पूरस्थिती नाही

थेरगावात संतोष मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी ८ वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत सोसायटीधारकांचा मेळावा होणार आहे. सोसायट्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी चालवली आहे. या विषयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे.यासंदर्भात भाजप नेते एकनाथ पवार यांनी, शहरभरातील सोसायट्यांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश आहे, अशी टीका केली आहे. ज्या राष्ट्रवादीकडे शहराचा २० वर्षे कारभार होता, त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळेच सोसायटीधारकांना पायाभूत समस्या मिळू शकल्या नाहीत. पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून हे प्रश्न सुटत नसल्याने अजित पवारांना शहरात यावे लागले. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोसायटीधारक मतदारांना आकर्षित करण्याचे राष्ट्रवादीचे हे मतांचे राजकारण सुरू आहे, अशी टीका एकनाथ पवार यांनी केली आहे.

हेही वाचा >>> मनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन

प्रत्युत्तरादाखल राष्ट्रवादीचे प्रवक्ते विनायक रणसुभे म्हणाले, की भाजपची केंद्रात ८ वर्ष सत्ता असून राज्यात आणि पिंपरी महापालिकेत प्रत्येकी पाच वर्ष भाजपकडेच सत्ता होती. सर्वत्र सत्ता असतानाही भाजपला सोसायटीधारकांचे प्रश्न सोडवता आले नाही. म्हणूनच राष्ट्रवादीने ‘संवाद सोसायटीधारकांशी’ हा उपक्रम राबवला असून अजितदादांच्या माध्यमातून सोसायटीधारकांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. भाजपने पालिकेतील पाच वर्षांच्या सत्ता काळात लाचखोरी, खंडणीखोरी, भ्रष्टाचार करून स्वतःची घरे भरली. भाजपच्या भ्रष्ट राजवटीला शहरातील जनता कंटाळलेली आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, हेच एकनाथ पवारांच्या वक्तव्यावरून दिसून येते, असे रणसुभे म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या