पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाभोवती राज्यातील राजकारण फेर धरताना दिसत आहे. या प्रकरणी एका मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी रात्री भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले होते. मात्र, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नावं घेणं टाळलं आहे. त्यामुळे भाजपात एकवाक्यता नाही का?, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

पुण्यातील वानवडी भागात राहणारी पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी महा विकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचे नाव पुढे येत आहे. त्यावरून भाजपाकडून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात फडणवीस यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले असताना भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे थेट नाव घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाजपाच्या एका प्रमुख महिला पदाधिकाऱ्याने त्या मंत्र्यांचे नाव घेतले आहे. मात्र, या घटनेमागे कोणता मंत्री आहे? असा प्रश्न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला, असता त्यांनी संबधित मंत्र्यांचे नाव घेणं टाळलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महिला सुरक्षितेवर बोलत असत. ते महिलांना न्याय देण्याचे काम करीत असत. आता त्यांचे चिरंजीव म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आत्महत्येची सखोल चौकशी करून पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी आमची मागणी आहे. पुणे पोलिसांमार्फत चौकशी करून सत्य बाहेर आणण्यात यावे. या आत्महत्येमागे एक मंत्री आहे. मोबाईल संभाषणावरून हे स्पष्ट झाले असून, लॅपटॉप स्कॅन केले तर आणखी पुरावे मिळतील. त्या दृष्टीने तपास होणे गरजेचं आहे,” असं पाटील म्हणाले.

नाव घेण्यावरून भाजपात गोंधळ?

पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचे नाव न घेता चौकशीची मागणी करणारे पत्र पोलीस महासंचालकांना दिले होते. दुसरीकडे याच प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी भाजपाच्याच प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मंत्र्याचे थेट नाव घेणं टाळलं. त्यामुळे भाजपात नाव घेण्यावरून दोन प्रवाह का झाले आहेत, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.