पुणे : यंत्रणा सक्षम नसल्या आणि असलेल्या मोडीत काढलेल्या असल्या, की शहरवासीयांची आबाळ होऊन अख्ख्या शहराची कशी वाट लागते, हे शहराने गुरुवारी अनुभवले. पावसाच्या या थैमानात सात जणांचा बळी गेला. पाऊस जोरातच पडला, पण हवामान विभागाचे अगम्य इशारे, धरणातून पाणी सोडण्याबाबत समन्वयाचा अभाव यांत भरडला गेला, तो सामान्य पुणेकर. वेळोवेळी चर्चा झडूनही निसर्गाला अक्षरश: ओरबाडून त्याच्या उरावर उभ्या राहत असलेल्या विकास प्रकल्पांमुळे ज्या सामान्य माणसासाठी हे सगळे केले जात असल्याचा आव आणला जातो, त्याचेच जगणे किती जिकिरीचे झाले आहे, याचाही प्रत्यय आला. शहरवासीयांना ज्या हालांना सामोरे जावे लागले, त्यांची उत्तरे मागायची कुणाकडे, या निरुत्तरित प्रश्नाने गुरुवार मावळला… आजचा दिवस फक्त मागील पानांवरून पुढे असेल, की यातून काही शिकणारा?… प्रश्न संपलेले नाहीतच…

पावसाने संततधार स्वरूपात हजेरी लावून आपण मोठ्या मुक्कामासाठी आलो आहोत, याची चुणूक दाखवायला बुधवारी सायंकाळीच सुरुवात केली होती. रात्री उशिरा त्याने जो जोर धरला, त्याने विशेषत: नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांच्या मनात शंकेची पाल नक्कीच चुकचुकली. खडकवासला धरणातून बुधवारी दुपारीच विसर्ग वाढविण्यात आला होता, जो जोरधारेमुळे मध्यरात्री आणखी वाढला. पावसाच्या आवाजानेच जागे राहिलेल्या नदीकाठच्या गृहनिर्माण संस्थांतील रहिवाशांना पहाटे तीनच्या सुमारास धडकी भरू लागली, जेव्हा काहींच्या पार्किंगमध्ये, तर काहींच्या तळमजल्यांवरील घरात पाणी येऊ लागले.

हेही वाचा…जुनी करप्रणाली मोडीत काढण्याचे प्रयत्न; सनदी लेखाकार दीपक टिकेकर यांचे मत

घरांत, वस्तीत पाणी शिरल्याचे, रहिवासी अडकल्याची माहिती अग्निशामक दलाकडे येऊ लागली. झाडे पडल्याची वर्दी तर शहरभरातून सातत्याने येत होती. हवामान विभागाचा नारिंगी इशारा असल्याने एवढ्या पावसाचा अंदाज नव्हता, पण त्याचे रौद्र रूप पाहून सकाळी लवकरच शाळांना सुटी देण्याचा आदेश निघाला. तोवर सकाळी लवकरची शाळा असलेल्या मुलांना काही पालक, काही स्कूल व्हॅन व रिक्षा शाळेपर्यंत घेऊनही आल्या होत्या. त्यांना घरी परतावे लागले. जवळपास ८० ठिकाणी झाडे पडल्याच्या, फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. घरांच्या भिंती कोसळणे, गाड्यांवर मोठ्या फांद्या पडणे अशाही घटना घडल्या. रस्त्यांवरून तर पाण्याचे पाट वाहिले. पाऊस म्हटले, की विजेचा खोळंबा हे समीकरण झालेच आहे. परिणामी, पावसामुळे घरून कामाचा पर्याय मिळालेल्या अनेकांची वीज नसल्याने प्रचंड गैरसोय झाली. शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचीही पावसाने दैना केली. दरडी कोसळणे, त्यामुळे घाट रस्ते बंद पडणे अशा घटना घडल्या. सुदूर ठिकाणी राहणाऱ्यांचा संपर्क तुटला.

अग्निशामक दल, पोलीस प्रशासन, आपत्ती निवारण दल, महापालिका प्रशासनाचे कर्मचारी आदींबरोबरच राजकीय पक्षांचे, गणेश मंडळांचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले. पालकमंत्री, पोलीस आयुक्त, जिल्हा प्रशासन यांनी आढावा घेऊन जेथे जेथे मदतीची गरज होती, तेथे ती पुरविण्याची काळजी घेतली. आपत्तीच्या काळात मदतीचा हात तर मिळाला, पण दिवस संपता संपता पुणेकरांच्या मनात संपूर्ण व्यवस्थेविषयी अनेक प्रश्न उमटून गेले…

हेही वाचा…रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग; २५४ जणांची अग्निशमन दलाकडून सुटका

नदीच्या पात्रात बांधकामांना परवानगी मिळते कशी? पूररेषा निश्चित असेल, तर नदी केवळ पात्रातून वाहिली, तरी पूर कसा येतो? नाल्यांची सफाई केल्याचे दावे करूनही ते त्यांची वाट सोडून इकडे-तिकडे सैरावैरा धावतात कसे? पावसाळापूर्व सर्व कामे पूर्ण केल्याची ग्वाही देऊनही रस्ते खड्डेमय होतातच कसे? गटारांच्या झाकणांपासून थेट नदीत कचरा, बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांवर नक्की काय कारवाई होते? दर गुरुवारी तांत्रिक कामे करूनही पाऊस म्हटल्यावर लगेच वीज गायब कशी होते? सिमेंटच्या रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होण्यास, ते जमिनीत मुरण्यास अडथळे येत असूनही एका मागोमाग एक रस्ते सिमेंट-काँक्रीटचेच कसे होतात? आणि आपत्तीच्या वेळी आवर्जून अस्तित्व दाखवणारे नेते, अशी परिस्थितीच उद्भवू नये म्हणून करायच्या मूलभूत कामांवेळी नेमके कुठे असतात? त्यांची काय भूमिका असते? आणि पुन्हा फिरून प्रश्न… या प्रश्नांची उत्तरे कधीच का मिळत नाहीत?… दर वेळी हा प्रश्न मात्र नव्याने पडत राहतोच… खरेच, प्रश्न संपलेले नाहीतच…