पुणे : कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना पोलिसांनी अटक केली होती. आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) दोघांचाही वैद्यकीय परवाना निलंबित केला आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना आधी नोटीस बजावली होती. या नोटिशीला दोघांनीही वकिलांच्या माध्यमातून उत्तर दिले होते. मात्र, दोघेही सध्या कारागृहात असल्याने ते परिषदेसमोर सुनावणीला हजर राहून बाजू मांडू शकले नाहीत. परिषदेने या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि पुणे पोलिसांकडून अहवाल मागविले होते. या अहवालाच्या आधारे परिषदेने दोघांचे वैद्यकीय परवाने निलंबित केले आहेत. परिषदेकडून याप्रकरणी अंतिम निर्णय होईपर्यंत दोघांचेही परवाने निलंबित राहणार आहेत. राज्यातील डॉक्टरांची नोंदणी परिषदेकडे असते. या नोंदणीनुसारच डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करता येतो. आता या दोघांचीही नोंदणी रद्द करण्यात आल्याने त्यांना वैद्यकीय सेवा करता येणार नाही.

गेल्या वर्षी १९ मे रोजी कल्याणीनगर परिसरात भरधाव पोर्शे मोटार चालविणाऱ्या अल्पवयीन युवकाने दुचाकीस्वार अभियंता आणि त्याच्या मैत्रिणीस धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन युवकाची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली. मात्र, आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले. त्यामुळे डॉ. तावरे आणि आपत्कालीन विभागातील तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हाळनोर या दोघांना पोलिसांनी अटक केली. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने याप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीने दोघांनाही सेवेतून निलंबित केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोर्शे अपघातप्रकरणी पुणे पोलिसांचा तपास अहवाल आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने नेमलेल्या चौकशीचा अहवाल महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने तपासला. या प्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर कारागृहात असल्याने परिषदेसमोर सुनावणीस हजर राहू शकले नाहीत. परिषद याप्रकरणी अंतिम निर्णय घेईपर्यंत दोघांचेही वैद्यकीय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
डॉ. विंकी रुघवानी, प्रशासक, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद